शनिदेव पत्नीसह विराजमान असलेले एकमेव मंदिर

shanidev
भारतीय संस्कृतीत ३३ कोटी देव असल्याचे सांगितले जात असले तरी त्यातील सर्वाधिक पिडा देणारा देव म्हणून शनिदेव प्रसिद्ध आहेत. शनीची साडेसाती आणि शनी महादशा अनेकांना त्रासदायक ठरते त्यामुळे देशातील बहुतेक सर्व शनी मंदिरात भाविकांची नेहमीच गर्दी असते. अर्थात बहुतेक सर्व मंदिरात एकट्या शानिदेवाचीच मूर्ती पाहायला मिळते. शनिदेवाच्या अनेक मंदिरात महिलांना पूजा करण्यास मनाई आहे. मात्र छत्तीसगड राज्यातील अतिप्राचीन शनिमंदिर या सर्व मंदिरात एकमेवाद्वितीय आहे.

छत्तिसगढच्या कवढी पासून १५ किमी कारीयामा गावात हे मंदिर असून तेथे जाण्याचा रस्ता अवघड आहे. या मंदिरात शनिदेव त्यांची पत्नी देवी स्वामिनीसह विराजमान आहेत आणि मुख्य म्हणजे या मंदिरात पतीपत्नी जोडप्याने पूजा करू शकतात. महाभारत काळातील हि मूर्ती असल्याचे व या मूर्तीची स्थापना पांडवानी भोरमदेव जंगलात वनवासात असताना केल्याचे सांगितले जाते.

या मूर्तीला मोहरीचे तेल अर्पण करण्याची प्रथा आहे. मूर्तीवर तेलाचे थर साठल्याने मूर्ती कशी आहे ते समजू शकत नव्हते तेव्हा हे थर स्वच्छ केले गेले. त्यात शनिदेव पत्नी देवी स्वामिनीसह असल्याचे दिसून आले. असा समज आहे, जे भक्त खऱ्या दिलाने मनातील इच्छा शानिदेवाना सांगतात, त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. लग्नानंतर जोडप्याने पूजा केल्यास संसार सुखाचा होतो. लग्न जमत नसेल अश्या लोकांनी येथे पूजा केली तर लग्न जमते. शानिदेवाना मोहरीच्या तेलाचा अभिषेक केल्यास साडेसाती, महादशा यांचा त्रास होत नाही. या मंदिरात जाण्यासाठी ४ किमीचा खडतर रस्ता पार करावा लागतो तरीही येथे भाविकांची मोठी गर्दी असते.

Leave a Comment