ऑगस्ट २०१९ पर्यंत पूर्ण होणार ‘५ जी’च्या लिलावाची तयारी

trai
नवी दिल्ली – केंद्र सरकार ऑगस्ट २०१९ पर्यंत ५ जी स्पेक्ट्रम लिलावाच्या प्रक्रियेची तयारी पूर्ण करणार असल्याची माहिती दूरसंचार मंत्रालयाच्या सचिव अरुणा सुंदरराजन यांनी राष्ट्रीय डिजीटल संवाद धोरणाच्या परिषदेत दिली.

दूरसंचार विभाग केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या ५ जी टास्क फोर्स आणि ट्राय यांनी केलेल्या शिफारसीप्रमाणे काम करत असल्याचे अरुणा सुंदरराजन यांनी सांगितले. ‘५ जी’करता आवश्यक व्यवस्था तयार नसल्याचे प्रत्येकजण सांगत आहे. पण ही तयारी पुढील वर्षी जुलै-ऑगस्टदरम्यान पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जेणेकरुन स्पेक्ट्रम लिलावाची प्रक्रिया सुरू करता येईल, असे त्यांनी सांगितले. ५ जी नेटवर्कमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर १ लाख कोटींचा परिणाम जाणवेल, असे सांगत त्यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. २०२० पर्यंत ‘५ जी’चे नेटवर्क देशात आणणे केंद्र सरकारला अपेक्षित आहे. दूरसंचार कंपन्या आर्थिक अडचणीत असल्याने त्यांनी याविषयी चिंता उपस्थित केली होती.