बँक खात्यात १५ लाख जमा करण्यासाठी सरकार कटिबद्ध; पण रिझर्व्ह बँक सरकारला पैसे देत नाही

ramdas-aathawale
सांगली – केंद्रातील मोदी सरकार लोकसभा निवडणुकीपुर्वी दिलेल्या आश्वासनानुसार प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख जमा करण्यासाठी कटिबद्ध आहे, पण सरकारला रिझर्व्ह बँक पैसे देत नसल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी इस्लामपूरमधील पत्रकार परिषेदत म्हटले आहे.

आठवलेंनी काळा पैसा आणि प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करण्याच्या मुद्द्यासह नुकत्याच झालेल्या विधानसभा निकालावरही भाष्य केले. जरी भाजपविरोधात पाच राज्यातील निकाल लागले असले तरी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत याचा परिणाम होणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या तीन महिने आधी राजकीय हवा बदलेल. यामुळे नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील.

आम्ही निवडणुकीच्या तीन महिने आधी सगळी हवा बदलू आणि पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान बनवू असा विश्वास मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. देशातील सर्व दलित हे आरपीआयच्या बाजूने आहेत आणि आरपीआय पक्ष शेवटपर्यंत भाजपसोबतच असणार आहे. तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आरपीआयसाठी लोकसभेच्या दोन जागा मागणार असल्याचे आठवलेंनी स्पष्ट केले.

निवडणुकीपूर्वी केलेल्या घोषणांपैकी काही घोषणा पूर्ण झाल्या आहेत. त्याच बरोबर नागरिकांच्या खात्यावर १५ लाख जमा करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र रिझर्व्ह बँक आम्हाला पैसे देत नाही, याबाबत सरकारची रिझर्व्ह बँकेशी बोलणी सुरु असून लवकरच प्रत्येकाच्या खात्यात पैसे जमा होतील असा विश्वासही आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Comment