नाराज मेटेंचे मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम; महाआघाडीचा पाठिंबा काढणार शिवसंग्राम ?

vinayak-mete
बीड – स्वत:चे आत्मचिंतन शिवसंग्राम पक्षाने केले असून आता त्याच आत्मचिंतनानंतर भाजपला रामराम ठोकण्याचे संकेत मिळत आहेत. मला भाजपने आता बोलावून जरी मंत्रीपद दिले तरी मला त्यांनी दिलेले मंत्री पद नको, अशी भूमिका शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी घेतली. त्याचबरोबर भाजपला बीड जिल्हा परिषदमध्ये दिलेला पाठिंबा लवकरच काढून घेणार असून शिवसंग्राम आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याचे मेटे यांनी सांगितल्यामुळे पालकमंत्री पंकजा मुंडे यांना शिवसंग्रामच्या या भूमिकेमुळे धक्का बसेल का? याची मोठी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

भाजपबरोबर महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेत राहिलेल्या इतर घटक पक्षांमध्ये भारतीय संग्राम परिषदेचा (शिवसंग्राम) समावेश आहे. भाजपला आपण पाठिंबा दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेत्तृत्वावर विश्वास ठेवून दिला होता. पण आता त्याच मेटे यांनी बीड येथील राज्य कार्यकारिणी बैठक घेवून भाजपबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यांनी या बैठकीत ६ ठराव घेतले. भाजपला लवकरच मेटे रामराम ठोकणार असल्याचे संकेत त्यांनी या पत्रकार परिषदेत दिले. त्याचबरोबर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक शिवसंग्राम स्वतंत्रपणे लढणार असल्याचे देखील मेटे यांनी सांगितले.

शिवसंग्रामची बीड येथे पहिल्यांदाच राज्य कार्यकारीणीची बैठक झाली. मेटे यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीरपणे माध्यमांसमोर मांडली. शिवसंग्रामच्या नेत्या आमदार भारती लव्हेकर, प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, महिला आघाडीच्या दिपाली सय्यद, जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, जि. प. सदस्य अशोक लोढा यांची यावेळी उपस्थिती होती.

शिवसंग्रामच्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत घेतलेल्या ठरावामध्ये भाजप सरकार शेतकरी पेन्शन योजना, सुशिक्षीत बेरोजगार भत्ता, नदीजोड प्रकल्पांना चालना आदी विषयांवर गंभीर नसून मागील ४ वर्षात शिवसंग्रामने अनेकवेळा शेतकरी आणि बेरोजगारांचे प्रश्न सरकार समोर मांडले. पण याकडे भाजप सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप मेटे यांनी जाहीरपणे केला आहे. पहिल्यांदाच भाजपवर मेटे यांची नाराजी व्यक्त होत आहे असे नाही. भाजपने त्यांना मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले होते. पण प्रत्यक्षात मला मंत्रीपदापासून दूर ठेवले गेले. मेटे मंत्रीपदाचा विषय निघताच भाजपने शब्द पाळलेला नसल्याची जाहीर कबुली देतात. शिवसंग्रामची राजकीय भूमिका येणाऱ्या काळात काय असेल हे ६ जानेवारी २०१९ च्या मेळाव्यातूनच स्पष्ट करणार असल्याचे मेटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Leave a Comment