तुमची नखे तुमच्या आरोग्याबद्दल काय सांगतात?

nail
कोणताही आजार शरीरामध्ये उत्पन्न झाला की त्याची लक्षणे कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येत असतात. कधी डोळ्यांमध्ये आलेल्या लालीवरून, किंवा डोळ्यांवर सूज असल्यास, जिभेवर पांढरा थर असल्यास, तर कधी नखांवरूनही आपल्या तब्येतीचा अंदाज लावता येऊ शकतो. आपल्या शरीरामध्ये एखादी व्याधी उत्पन्न झाल्यास त्याच्या निश्चित खुणा नखांवरही दिसून येतात. अनेकदा नखे अचानक अर्धवट तुटू लागतात, त्यांचे तुकडे पडू लागतात. हात सतत पाण्यामध्ये असणे, किंवा नेल पॉलिशचा अतिवापर या कारणांमुळेही नखे तुटू शकतात. तसेच जसजसे व्यक्तीचे वय वाढत जाते तसतशी नखे अधिक ठिसूळ होऊ लागतात. या सर्व कारणांच्या शिवाय नखे तुटण्यामागे हायपोथायरॉईडिझम हे देखील एक कारण असू शकते. हायपोथायरॉईडीझम मुळे नखे कमकुवत होऊन सतत तुटत असल्यास बायोटीन सप्लीमेन्टस् घेतल्याने लाभ होऊ शकतो. तसेच पाण्यामध्ये कामे करीत असताना हातांमध्ये ग्लोव्हज घातल्यानेही नखे तुटण्याचे प्रमाण कमी होईल. त्या व्यतिरिक्त हातांना आणि नखांना आर्द्रता मिळण्याकरिता दिवसातून तीन ते चार वेळा मॉईश्चरायझर लावणे आवश्यक आहे.
nail1
काही व्यक्तींची नखे जाड होऊन पिवळी पडू लागतात. क्वचित यांच्यावर हिरवट छटा ही दिसू लागते. शरीरातील लिम्फॅटिक सिस्टम सुरळीत काम करीत नसल्याचे हे लक्षण आहे. पिवळी पडलेली नखे फंगल इन्फेक्शन्स चा परिणाम असू शकतात, तसेच जाड आणि पिवळी नखे फुफ्फुसांशी निगडित व्याधी असण्याचे सूचक देखील असू शकते. नखे जाड आणि पिवळी होण्याव्यतिरिक्त जर श्वास घेण्यास कोणत्याही प्रकारचे त्रास जाणवू लागला तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या साठी ए जीवनसत्वाची सप्लीमेन्ट घेतल्याने फायदा दिसून येतो.
nail2
अनेकदा नखांवर लहान लहान खड्डे दिसून येतात. याला ‘नेल पिटिंग’ म्हटले जाते. सामान्यपणे यामागे फंगल इन्फेक्शन सोरायसिस हे कारण असू शकते. काही ठराविक कनेक्टीव्ह टिश्यूना इजा झाल्यामुळेही नखांवर खड्डे दिसून येतात. जर सोरायसीस वाढत गेला, तर नखांवरील खड्डे देखील वाढू लागतात. त्याचबरोबर नखांचा नेहमीचा रंग जाऊन नखे बेरंग दिसू लागतात, आणि त्यांचा आकारही बदलू लागतो. या समस्यांना ठीक होण्याकरिता जास्त अवधी लागतो. यासाठी सर्वसाधरणपणे फोटोथेरपी, आणि ड जीवनसत्वाच्या सप्लिमेन्टस् दिल्या जातात. तसेच योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणे आणि नखांना आर्द्रता मिळेल याची काळजी घेणे आवश्यक आहे.
nail3
क्वचित नखांवर निळसर झाक दिसू लागते. नखांना प्राणवायूचा होणारा अपुरा पुरवठा हे यामागचे कारण आहे. विशेषतः थंड प्रदेशामध्ये ही समस्या जास्त प्रमाणात आढळून येते. जास्त थंडी असताना नखांच्या खाली असलेल्या रक्त कोशिका आकुंचन पावतात, आणि त्यामुळे नखांना पुरेसा प्राणवायूचा पुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळेच नखांवर निळसर झाक दिसू लागते. पण ही समस्या कायमस्वरूपी आणि कठीण नसून, तात्पुरती आणि सहज बरी होऊ शकेल अशी आहे. जर नखांवर निळसर झाक दिसू लागली, तर दररोज नखांच्या भोवती तेलाने हलक्या हाताने मालिश करावी. मालिश केल्याने रक्ताभिसरण वाढून नखांना प्राणवायूचा पुरेसा पुरवठा झाल्याने ही समस्या दूर होते.