एकाच षटकात इशांत शर्माने टाकले चक्क ६ ‘नो बॉल’; पण ते पंचाना दिसलेच नाही!

ishant-sharma
अॅडलेड – ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात एका षटकात सहा ‘नो बॉल’ भारताचा जलदगती गोलंदाज इंशात शर्माने टाकले होते. पण ते पंचाना दिसलेच नाहीत असा दावा ‘फॉक्स स्पोर्ट्स’ या क्रीडा वाहिनीने केला आहे. याबाबत ऑस्ट्रेलियातील ‘डेली टेलीग्राफ’च्या अहवालानुसार इशांतने पहिल्या कसोटीत १६ वेळा नो बॉल टाकला होता. त्यातील फक्त ५ वेळाच पंचानी नो बॉलचा इशारा दिला, असे म्हटले आहे.

त्याने या १६ नो बॉल मधील दोनवेळा गडी बादही केला होता. पण नो बॉल डीआरएस मागवल्यावर दिसल्याने गडी बाद ठरवण्यात आला नसल्याचेही टेलीग्राफकडून सांगण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने याप्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. रिकी पॉन्टिंग अॅडलेड कसोटीवेळी समालोचन करत असताना एका षटकात इशांतने ४ वेळा नो बॉल टाकल्याचे सांगितले. पण पंचांनी यातील एकाही वेळी नो बॉल दिला नाही. हा विषय रिकी पॉन्टिंगने वारंवार लावून धरल्याने ‘फॉक्स स्पोर्ट्स’ने इशांत शर्माने टाकलेली सर्व षटके तपासून पाहिली. यामध्ये इशांतने एकाच षटकात ६ ओवर स्टेप म्हणजेच नो बॉल टाकल्याचे दिसून आले. पण पंचांनी यातील एकाही वेळी आक्षेप घेतला नाही.


ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंनी याप्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. पंचांवर टीका करताना ते आळशी झाले असल्याचे डेमियन फ्लेमिंग आणि ब्रॅड हॉज यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी केलेला हा दावा कितपत खरा आहे हे माहीत नाही. मात्र, यात सत्यता आढळल्यास आयसीसी याची चौकशी करू शकते. पर्थ कसोटीत इशांतने टाकलेल्या पहिल्या षटकाचा व्हिडिओ फॉक्स स्पोर्ट्सने ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यामध्ये इशांतचा पाय रेषेच्या बाहेर जाताना दिसत आहे.

Leave a Comment