दुसऱ्या दिवसाखेर भारत ३ बाद १७२; ऑस्ट्रेलिया १५४ धावांनी आघाडीवर

team-india
पर्थ – भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर ३ बाद १७२ धावा केल्या असून तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३२६ धावांवर आटोपला. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे या दोघांनी त्यास प्रत्युत्तर म्हणून केलेल्या नाबाद भागीदारीच्या जोरावर भारताला या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने २ तर हेजलवूडने १ बळी टिपला.

भारताच्या डावाची या सामन्यातील सुरूवात खराब झाली. भारताने उपहारापर्यंत ६ धावा करून मुरली विजयचा बळी गमवला. दुसऱ्या सत्रात २ धावा काढून राहुल त्रिफळाचित झाला. विराट कोहलीबरोबर अर्धशतकी भागीदारी करणारा पुजारा तिसऱ्या सत्राच्या सुरूवातीला २४ धावांवर झेलबाद झाला आणि भारताला तिसरा धक्का बसला. त्याला यष्टीरक्षकाकरवी स्टार्कने झेलबाद केले.

त्याआधी दुसऱ्या दिवशी चांगली सुरुवात मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांना अखेर भारतीय गोलंदाजांनी झटपट माघारी धाडले. सर्वाधिक ४ बळी टिपत इशांत शर्माने यजमानांचा डाव गुंडाळण्यात महत्वाची भूमिका बजावल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सर्वबाद ३२६ वर आटोपला.

Leave a Comment