मुंबई – भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू आणि २०११ च्या विश्वविजेता भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी अर्ज केला असून बीसीसीआयने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी गॅरी कर्स्टन यांचा अर्ज
अतुल बेडाडे, डेविड जॉनसन, राकेश शर्मा, मनोज प्रभाकर, ओवेश शाह, हर्षल गिब्स, दिमित्री मास्करेनहास, डॉमिनिक थॉरनेली, गार्गी बॅनर्जी, विद्युत जयसिम्हा, रमेश पोवार, कोलिन सिलर आणि डेव वॉटमोर यांनी भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला आहे. गॅरी यासर्वामध्ये सर्वात पुढे आहेत. भारतीय क्रिकेट पुरुष संघाने गॅरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहचवण्यास मदत केली होती.
त्याचबरोबर किंग्स इलेवन पंजाब संघाचे मुख्य प्रशिक्षक माइक हसी यांनीही अर्ज केल्याचे समजते. बीसीसीआयने भारतीय महिला संघाचा प्रशिक्षक निवडण्यासाठी ३ सदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे. कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांचा त्या समितीत समावेश आहे.
३० नोव्हेंबरला माजी प्रशिक्षक रमेश पोवार यांचा कार्यकाल संपला आहे. बीसीसीआयने त्यानंतर प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले आहे. महत्त्वाच्या सामन्यात रमेश पोवार यांनी मिताली राज हिला संघाबाहेर ठेवल्याने त्यांना पदावरून दूर हटविण्यात आले. त्यानंतरही पोवार यांनी हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना यांच्या सांगण्यावरून प्रशिक्षक पदासाठी पुन्हा अर्ज केला आहे.