१० राज्यात बीएसएनएल सुरू करणार ४जी सेवा

BSNL
नवी दिल्ली – ४ वर्षांपूर्वी देशातील ४जी सेवेला सुरुवात करण्यात आली होती. सद्यस्थितीत सर्व खासगी कंपन्या ४जी सेवा प्रदान करत आहेत. पण काही सर्कलमध्येच बीएसएनएल ४जी सेवा देत आहे. आता भारत दूरसंचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएलने १० राज्यात ४जी सेवा सुरू करणार आहे.

या सर्कलमध्ये ४जी सेवेची चाचणी घेण्यासाठी बीएसएनएलने सुरूवात केली आहे. बीएसएनएलने यासाठी नोकियासोबत करार केला आहे. देशातील १० सर्कलमध्ये नोकिया आणि भारत दूरसंचार निगम लिमिटेड संयुक्तीकरित्या ४जी सेवेची चाचणी करणार आहेत. गेल्या महिन्यात बीएसएनएलने गुजरातमध्ये ४जी सेवेची चाचणी सुरू केली होती. कंपनी आगामी काळात देशातील अन्य १९ टेलिकॉम सर्कलमध्ये ४जी सेवा सुरू करण्याची शक्यता आहे.

ज्या १० राज्यात ४जी सेवा बीएसएनएल सुरू करणार आहे त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गोवा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ आणि तेलंगणा राज्यांचा समावेश आहे. बीएसएनएल या राज्यात 2100 MHz स्पेक्ट्रम बँडच्या माध्यमातून ४जी सेवा सुरू करणार असल्याचे समजते. 2100 MHz बँडवर ४जी सेवा सुरू करण्यासाठी बीएसएनएलला हिरवा कंदील मिळालेला आहे. सध्या या बँडवर कंपनी ३जी सेवा देत आहे. ग्राहकांना बीएसएनएलचे आपले सिम कार्ड ४जी मध्ये अपग्रेड करावे लागणार आहे. कंपनी यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नसून २जीबी डेटाही देत आहे.