वारिस पठाणकडून राज ठाकरेंचा विझलेला दिवा असा उल्लेख

waaris-pathan
नागपूर – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांचा विझलेला दिवा म्हणून एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी उल्लेख केला आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे नागपुरमधील कस्तुरचंद पार्कवर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यांनी ही टीका यावेळी बोलताना केली. राज ठाकरे यांचा छोटे ठाकरे असा उल्लेख करत राज ठाकरे विझलेला दिवा असल्याची टीका वारिस पठाण यांनी केली.

या सभेला भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरदेखील उपस्थित होते. भाजपचा लोकसभा निवडणुकीत पराभव करुन मोहन भागवत यांना तुरुंगात टाकू, एके-४७ ही बंदूक भागवत यांनी बाळगली होती. १२ वर्षांची त्यासाठी शिक्षा आहे, हे त्यांनी विसरू नये, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. तुम्ही हा खेळ सुरु केला होता भागवत, आम्ही त्याचा अंत करु, असेही त्यांनी म्हटले आहे.

सत्ताधाऱ्यांवर सभेत आंबेडकर यांनी टीका केली. देशातील कायदा संघाला मानायचा नाही, स्वत:च्या संघटनेची नोंदणी करायची नाही आणि जे विरोधात उभे राहतील त्यांच्याविरुद्ध अफवा पसरवायच्या, हे काम सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. जो गवगवा पंतप्रधानांच्या खुनाच्या कटाच्या पत्राचा केला गेला ते पत्र बनावट आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या प्रकरणात मला गोवण्याचा प्रयत्न केला. पण मोहन भागवत तीन महिने वाट बघा, लोकसभेत तुमची संख्या दुहेरी आकड्यात मर्यादित करु आणि तुम्हाला तुरुंगात टाकू, असे आंबेडकर यांनी सांगितले. त्यांना कायद्यासमोर झुकवल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणालेत. एके-४७ बाळगण्यासाठी १२ वर्षांची शिक्षा आहे, हे विसरु नका, असेही त्यांना भागवतांना उद्देशून सांगितले. मोहन भागवत एके -४७ घेऊन फिरत आहे, पण त्यांच्यावर साधा गुन्हा दाखल केला जात नाही, अशी टीका त्यांनी पोलीस खात्यावर केली.

Leave a Comment