जर्मनीत झाला- ‘असावा सुंदर चॉकलेटचा रस्ता…!’

chocolate
जर्मनीत चॉकलेटच्या एका कारखान्यातील गळतीमुळे एका संपूर्ण रस्त्यावर द्रव चॉकलेट पसरले होते. गंमत म्हणजे हे चॉकलेट नंतर घट्ट झाल्यामुळे काही काळ हा रस्ता चॉकलेटचा झाला होता.

पश्चिम जर्मनीतील वेस्टोनेन या शहरात ही घटना घडली. येथील ड्राईमाईस्टर या प्रसिद्ध चॉकलेटच्या कारखान्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे द्रव चॉकलेट कारखान्याबाहेर आले. या कारखान्यातील स्टोरेज टँक गळू लागल्यामुळे हे चॉकलेट रस्त्यांवर वाहू लागले, असे सोएस्ट्र आनत्साईशर या वृत्तपत्राने म्हटले आहे.

जवळपास एक टन द्रव चॉकलेट रस्त्यावर आले आणि थंडीमुळे ते कडक बनले. हे चॉकलेट काढून टाकण्यासाठी अग्निशमन दलाचे सुमारे 25 कर्मचारी कार्यरत होते. त्यांनी फावडे आणि गरम पाण्याच्या मदतीने हे संपूर्ण चॉकलेट काढले.

मात्र हा कारखाना परत बुधवारी चालू करणार असून येत्या ख्रिसमसच्या निमित्ताने चॉकलेट कमी पडणार नाही, असे आश्वासन कंपनीच्या वतीने देण्यात आले आहे. यासाठी खास तज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. नाताळच्या आगे-मागे हा अपघात घडला असता तर ती फार मोठी आपत्ती ठरली असती, असे कंपनीचे प्रमुख मार्कस लकी यांनी या वृत्तपत्राला सांगितले.

Leave a Comment