युक्रेनमधील ३३ वर्षीय एलेना क्रवचेन्को हिचे फोटो सध्या सोशल मिडीयावर खूपच गाजत आहेत. लांबसडक सोनेरी केसाच्या परीबद्दल आपण बालकथातून वाचलेले असते. एलेना सध्या सोनेरी केसांची परी म्हणून प्रसिद्धीस आली आहे. तिने गेल्या २८ वर्षात तिचे केस कापलेले नाहीत त्यामुळे तिचे हे घनदाट सोनेरी केस आता २ मीटर म्हणजे चक्क ६ फुट ५ इंच लांब झाले आहेत. तिने तिचे केस शेवटचे कापले त्यावेळी ती ५ वर्षाची होती.
लांबसडक सोनेरी केसांची परी एलेना
एलेना आज दोन मुलींची आई आहे. ती सांगते तिच्या लहानपणी तिच्या आईने स्त्रीचे सौंदर्य तिच्या लांबसडक केसात दडलेले असते असे सांगितले होते. तेव्हाच एलेनाने यापुढे केस कापायचे नाहीत असा निर्णय घेतला आणि तो पाळला. एलेना सांगते शाळा संपली आणि माझे केस वेगाने वाढले. अर्थात तिला केस मोकळे सोडणे आवडत असले तर सोसत नाही. कारण त्यामुळे तिला मुलांपासून दूर राहावे लागते अन्यथा मुले केस ओढतात. एलेनाचे केस नुसते लांब नाहीत तर घनदाट आणि आरोग्यपूर्ण आहेत. कधी विशेष कारणाने ती केस मोकळे सोडते तेव्हा त्यांचे सौंदर्य अधिक खुलते.
एलेनाची तुलना डिस्नीलँडच्या राजकुमारी रापुंझेलबरोबर केली जाते. या राज्कुमारीचे केस असेच सोनेरी आणि खूप लांब होते. सार्वजनिक ठिकाणी एलेना केस मोकळे सोडून गेली तर आसपासचे लोक आश्चर्याने पाहतात. एलेनाला या केसांची खूप काळजी घ्यावी लागते. तिच्या दोन मुलीही केस वाढविणार आहेत असे ती सांगते. अर्थात एलेनाची केस इतके लांब असले तर जगात सर्वाधिक लांब केसाचे रेकॉर्ड चीनी महिला शी क्विपिंग हिच्या नावावर आहे. तिचे केस १८ फुट लांब आहेत.