अहंकाराचा पराभव महाभारतातही झाला होता – शिवसेना

uddhav-thakre
मुंबई- काँग्रेसने तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवला. राहुल गांधींनी हा विजय नम्रपणे स्वीकारत भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. पण राहुल गांधींचे मोदी-शाहांनी अभिनंदनही केले नाही, असा चिमटा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून काढला आहे. तसेच महाभारतातही अहंकाराचा पराभव झाल्याचा टोला अग्रलेखातून लगावला आहे.

देश उभारणीतील पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे योगदान मोदी मानायला तयार नाहीत. त्याचबरोबर त्यांना भाजप उभारणीतील लालकृष्ण अडवाणी आणि इतर कोणीही मान्य नसल्याचा अहंकार फक्त महाभारतात दिसला होता, पण त्याचाही पराभव झाल्याचे म्हणत मोदींवर ठाकरेंनी निशाना साधला.

मोदी आणि शाहांना पाच पैकी एकाही राज्याच्या निवडणुकीत विजय मिळवता आला नाही. कारण आता जनतेला व्यापारी नको आहेत. पक्षाचा पराभव चुकीचे तिकिट वाटप आणि स्थानिक नेत्यामुळे झाला, अशी कारणे जरी भाजप सरकारने दिली. तरी याच स्थानिक नेत्याना विजयाचे कितीदा श्रेय दिले गेले? असा सवालही उपस्थित करण्यात आला. काँग्रेसच्या राजवटीत काही गोष्टींचा अतिरेक झाला तेव्हा इंग्रज परवडले पण काँग्रेस नको अशी लोकांची धारणा झाली होती. पण आता काँग्रेस परवडली असे लोकांना वाटू लागले आहे.

काँग्रेसचे राहुल गांधी अध्यक्ष बनणे म्हणजे महात्मा गांधीच्या काँग्रेस बरखास्तीचे स्वप्न पुर्ण करण्यासारखेच आहे, अशी टीका भाजप सरकारने केली होती. त्यावेळस काँग्रसमुक्त भारतचे नारे देण्यात आले होते. पण छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेशमधील काँग्रेसला मिळालेला विजय राहूल गांधींनी नम्रपणे स्विकारला आहे. त्यांनी भाजपशासित मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत. राहूल गांधींनी सांगितले होते की २०१९ मध्ये आम्ही भाजपचा पराभव करू पण भाजपमुक्त हिंदुस्थानचा नारा देणार नाहीत. थट्टा आणि अहंकाराचा अतिरेक होतो, तेव्हा नरसिंहाचा अवतार जनता घेते. हा नरसिंह मतपेटीतून बाहेर येतो तसा तो ५ राज्यात आला भाजपने यावरून धडा घ्यावा. मात्र, धडा घेण्याची त्यांची इच्छा आहे काय? असा परखड सवालही सामनातून करण्यात आला आहे.