चार महिने आधीच बंद होणार गुगल प्लस

google
गुगल प्लस ही सोशल नेटवर्किंग साईट ठरलेल्या वेळेपेक्षा चार महिने अगोदरच बंद करण्यात येणार आहे. गुगलची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेट इन्कॉर्पोरेटेड कंपनीने हा निर्णय घेतला आहे. एका वर्षाच्या आत या सेवेत दुसऱ्यांदा बग आढळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

गुगल प्लसमधील एका बगमुळे पाच लाख वापरकर्त्यांवर परिणाम झाला आहे, त्यामुळे ही सेवा बंद करण्याचा निर्णय अल्फाबेटने गेल्या वर्षी घेतला होता. या बगमुळे वापरकर्त्यांची माहिती बाह्य डेव्हलपर्ससमोर उघड होण्याचा धोका आहे. आता ही सेवा एप्रिल महिन्यात बंद करण्यात येणार आहे. आधी ही सेवा ऑगस्ट 2019 मध्ये बंद होणार होती.

गुगल प्लसच्या सॉफ्टवेयरमधील गडबडीमुळे 2015 आणि मार्च 2018 पर्यंत अनेक डेव्हलपर्सना या वापरकर्त्यांची गोपनीय माहिती मिळाली होती. यानंतर तपासकर्त्यांना त्याचा शोध लागला आणि त्यात दुरुस्ती करण्यात आली.

प्रभावित डाटा हा स्टॅटिक आणि ऑप्शनल गुगल प्लस प्रोफाईलपुरताच मर्यादित आहे. यात नाव, ईमेल पत्ता, व्यवसाय, लिंग आणि वय यांचा समावेश आहे. कोणत्याही प्रोफाईलच्या माहितीचा दुरुपयोग झाल्याचेही समोर आलेले नाही. तसेच अन्य एखाद्या अॅपने ही माहिती मिळविल्याचा कोणताही पुरावा नाही, असे गुगलने मंगळवारी एक ब्लॉग पोस्ट लिहून स्पष्ट केले.