भाजप बनली आहे ‘मुर्दों की पार्टी’ – यशवंत सिन्हा

yashwant-sinha
पुणे – भाजप नेतृत्वावर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर शंका उपस्थित केली जात असून माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात भाजपवर जोरदार टीका केली. आता मोदींची जादू संपली असून भाजप ‘मुर्दों की पार्टी’ बनली आहे. जेथे फक्त दोन नेत्यांचेच सर्व काही चालते. त्यांना पक्षातील इतर कोणी आव्हान द्यायलाही घाबरतात, असे सिन्हा म्हणाले.

पक्ष नेतृत्वात निवडणूक निकालानंतर बदल होण्याची चिन्हे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी नितीन गडकरींच्या पंतप्रधान पदाबाबतच्या चर्चांनाही पूर्णविराम दिला. पक्षाला लोकसभा निवडणुकीत कमी जागा मिळाल्यास गडकरी हेही पंतप्रधान पदासाठीचा पर्याय राहतील, अशी चर्चा होती. पण ही चर्चा जे लोक करत आहेत, त्यांनी भाजपमध्ये सध्या दोनच व्यक्तींचे वर्चस्व आहे. त्यांच्याविरोधात कोणीही बोलण्यास धजावत नाही, हेही लक्षात घ्यावे. यामुळे दुसऱ्या व्यक्तीचा पंतप्रधान पदासाठी विचार होणे, ही बाब दुरापास्त असल्याचे बोलून सिन्हा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

भगव्या पक्षांची हार झाल्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये विरोधी पक्ष एकत्र येऊ शकतील. विधानसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान ही ३ प्रमुख राज्ये सध्या भाजपच्या हातून निसटली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करताना सिन्हा यांनी आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला हरवण्यासाठी २ पर्यायही सिन्हा यांनी सांगितले.

त्याचबरोबर निवडणूकपूर्व काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी राष्ट्रीय स्तरावर युती करावी. यामुळे भाजपविरोधातील मते विभागली जाणार नाहीत. तसेच, त्यांच्या प्रत्येक उमेदवाराविरोधात एक सक्षम उमेदवार मैदानात उतरवता येईल. पण या युतीचा प्रमुख बनण्याचा काँग्रेसने प्रयत्न करणे ही मोठी चूक ठरेल.

तृणमूल काँग्रेस (पश्चिम बंगाल), टीडीपी (आंध्र प्रदेश), द्रमुक (तमिळनाडू) आदी या प्रादेशिक पक्षांना भाजपच्या तुलनेत अधिक जागा मिळू शकतात. निवडणुकीनंतर युतीचे सरकार तयार केले जावे, असे मत सिन्हा यांनी व्यक्त केले. ते अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये मंत्री होते. ते म्हणाले, मोदी पंतप्रधान होण्याआधी कोण होते? ते एका राज्याचे मुख्यमंत्री होते. विरोधी पक्षांमध्ये असे अनेक नेते आहेत, जे पूर्वी मुख्यंमंत्री होते.