अल्पावधीतच इन्स्टाग्राम हे फोटोशेअरिंग अॅप खुपच लोकप्रिय झाले. तरुणांमध्ये फेसबुकची मालकी असलेले हे अॅप्लीकेशन विशेष लोकप्रिय आहे. इंस्टाग्राम सुरुवातीच्या काळात केवळ फोटो शेअरिंग एवढाचा मर्यादीत होते पण त्याचा वापर कालांतराने वाढला. आता व्यावसायिक कारणासाठीदेखील या अॅपचा वापर होऊ लागला आहे. तरुण उद्योजकांना इन्स्टाग्रामने व्यासपीठ उपलब्ध करून दिले. अनेक ब्लॉगरही याच इन्स्टाग्राममुळे हिट झाले. सगळ्यांपेक्षा वेगळे आणि लोकप्रिय असे आपले अॅप ठरावे यासाठी कंपनी सातत्याने प्रयत्न करत असते. यात युजर्सचा वापर जास्तीत जास्त सोपा व्हावा यासाठी नवनवीन बदल करण्यात येतात. इन्स्टाने आता अशीच एक नवी सुविधा आणली आहे, त्यामुळे इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आता युजर्सना व्हॉइस मेसेज करता येणार आहे.
युजर्सना आता इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पाठवता येणार व्हॉइस मेसेज
व्हॉटसअॅपप्रमाणे आता सर्वांना इन्स्टाग्रामवर व्हॉइस मेसेज पाठवता येणार आहे. हे नवीन फिचर अंड्रॉईड आणि अॅपल अशा दोन्ही युजर्ससाठी कार्यरत असेल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. पण युजर्सना ही सुविधा मिळण्यासाठी सर्वात आधी हे अॅप अपडेट करावे लागणार आहे. चॅट या पर्यायामध्ये युजर्सना यासाठी आता एक माईकचे चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला व्हॉइस मेसेज करता येणार आहे. या व्हॉइस मेसेजमध्ये काही गडबड झाल्यास डावीकडे स्वाईप केल्यावर हा मेसेज रद्द करता येणार आहे.
विशेष म्हणजे यात आपल्याकडून रेकॉर्ड करण्यात आलेला व्हॉइस मेसेज अनसेंड करायची सुविधाही देण्यात आली आहे. यासाठी आपल्याकडून पाठवण्यात आलेला व्हॉइस मेसेज दिर्घकाळासाठी प्रेस करुन ठेवावा लागेल. अनसेंड हा पर्याय त्याठिकाणी येईल आणि व्हॉइस मेसेज डिलीट करता येईल. आपली मिळकत इन्स्टाग्रामला वाढवायची असल्याने तसेच युजर्सची संख्या वाढवायची असल्याने हे नवे फिचर कंपनीने आणले असल्याचे सांगितले आहे.