लोणावळ्याच्या ‘मगनलाल’ चिक्कीचे उत्पादन व विक्री थांबविण्याचे आदेश

maganlal-chikki
पुणे – अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तोंडाला पाणी सुटावे अशा लोणावळ्याच्या या प्रसिद्ध मगनलाल चिक्कीच्या ‘मगनलाल फूड प्रोडक्ट्स’ या कंपनीला दणका दिला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) चिक्कीचे उत्पादन करू नये, व विक्री थांबवावी असे आदेश दिले आहेत.

काही त्रुटी चिक्कीच्या उत्पादनामध्ये आढळल्या असून त्यामुळे अन्न व सुरक्षा कायद्याचा भंग होत असल्याने उत्पादकांना नोटीस जारी करून कारवाई करण्यात आली आहे. एफडीएचे अधिकारी आर. आर. काकडे यांच्या पथकाने कंपनीचे भागीदार अशोक भरत अगरवाल यांच्या उपस्थितीत केलेल्या तपासणींतर्गत काही त्रुटी आढळल्या आहेत. उत्पादित खाद्यपदार्थाची कंपनीने कोणतीच चाचणी तसेच तपासणी केली नसल्याचे आढळून आले आहे. खाद्यपदार्थ मानवी सेवनास सुरक्षित असल्याची कोणतीही खात्री किंवा हमी त्यात नसल्याने विक्रीसाठी उत्पादित केलेला कोणताही खाद्यपदार्थ हा मानवी सेवनासाठी मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासल्याशिवाय त्याची विक्री करू नये असे आदेश दिले आहेत. खाद्यपदार्थांची तपासणी ‘फूड्स सेफ्टी अॅन्ड स्टॅन्डर्ड अॅथॉरिटी ऑफ इंडिया’च्या (एफएसएआय) मान्यताप्राप्त प्रयोगशाळा अथवा स्वतःच्या प्रयोगशाळेत करून घेणे आवश्यक होते, पण तशी कोणतीच तपासणी करण्यात आली नसल्याचे समोर आल्यानंतर हे आदेश देण्यात आले.

या संदर्भात उत्पादन व विक्री कायद्यानुसार अटींची पूर्तता केल्यानंतरच करता येईल. संबंधित कंपनीच्या प्रत्येक संचालकांना अन्न व सुरक्षा मानदे कायद्याच्या कलम ५५ नुसार त्रुटींची पूर्तता न केल्यास प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा होऊ शकते, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.