अशी कामगिरी करणारा ऋषभ पंत पहिलाच भारतीय खेळाडू

rishabh-pant
नवी दिल्ली – भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यात फलंदाजी करताना अपयशी ठरलेल्या पंतने यष्टीरक्षकाची जबाबदारी चोख पार पाडली आहे. पंतने या सामन्यात यष्टीमागे ११ खेळाडूंचे झेल टिपले आहेत. अशी कामगिरी आतापर्यंत एकाही भारतीय यष्टीरक्षकाला करता आलेली नाही.


१० झेलसह यापूर्वी साहा प्रथम क्रमांकावर होता. यष्टीरक्षक म्हणून साहाने याचवर्षी केपटाउन कसोटीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकाच कसोटी सामन्यात १० झेल घेण्याची कामगिरी केली होती. तर धोनी ९ झेलसह दुसऱ्या स्थानावर होता. पण या कसोटी सामन्यात पंतने ११ झेल घेत हा विक्रम आपल्या नावे केला आहे. धोनी-साहाला मागे टाकण्याबरोबरच पंतने डिव्हिलिर्सच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. २०१३ मध्ये पाकिस्तान विरोधात एका कसोटी सामन्यात डिव्हिलिर्सने ११ झेल घेतले होते. भारताच्या पंतला या खास विक्रमाबद्दल आयसीसीने ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

या सामन्यात पंतने पहिल्या डावात सहा आणि दुसऱ्या डावात पाच झेल घेतले आहेत. यष्टीरक्षक म्हणून पंत हा एका कसोटी सामन्यात १० किंवा त्यापेक्षा जास्त झेल घेणारा जगातील ६ वा यष्टीरक्षक ठरला आहे. याआधी जॅक रसेल(११), एबी डेविलियर्स(११), बॉब टेलर(१०), अॅडम गिलख्रिस्ट(१०) आणि साहा(१०) यांनी केली आहे.

पंत ऑस्ट्रेलिया बरोबरच्या पहिल्या कसोटी सामन्यात धोनीचे अनुकरण करताना दिसून आला. यष्टीमागून अश्विनला चेंडू कुठे टाकायचा याबद्दल सल्ला देताना दिसत होता. पंतने या सामन्यात उत्कृष्ट यष्टीरक्षकाचा नमुना सादर केला. विशेष म्हणजे, पंच यष्टीमागे स्लेजींग करतानाही दिसला. पंतचे स्लेजिंग पाहून सर्वांना धक्का बसला. स्लेजिंग करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Leave a Comment