विराट सेनेसमोर कंगारु चितपट; भारताचा ३१ धावांनी विजय

team-india
अॅडलेड – टीम इंडियाने अॅडलेड येथे कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला नमवत विजय मिळवला. भारताने ठेवलेल्या ३२३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या कांगारूंची चांगलीच दमछाक झाली. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात अॅडलेड येथे चार कसोटी सामन्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात त्यांचा डाव आटोपला. भारताने हा सामना जिंकत या मालिकेत १ – ० ने आघाडी घेतली आहे.

काल नाबाद ११ वरून पुढे खेळत असलेल्या हेडला आजच्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा केवळ ३ धावा जोडता आल्या. त्याला इशांत शर्माने रहाणेकरवी झेलबाद करत माघारी धाडले. त्यानंतर आलेल्या टिम पेनने शॉन मार्शला चांगली साथ देत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्या दोघांत चागंली भागीदारी होत असताना बुमराहने मार्शला तंबूत परतवत ही जोडी फोडली. उपहारासाठी खेळ थांबवण्यात आला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या ६ गडी गमावत १८६ धावा झाल्या होत्या. उपहारानंतर पण जास्त वेळ खेळपट्टीवर कांगारूना तग धरता आला नाही. बुमराहने उपहारानंतरच्या पहिल्याच षटकात टीम पेनलाही पंतकरवी झेलबाद करत माघारी पाठवले.

दरम्यान, कमिन्स ऑस्ट्रेलियाचा डाव सांभाळण्यासाठी एकाकी झुंज देत होता. मिशेल स्टार्कही त्याला चांगली साथ देताना दिसत होता. ही जोडगळी डोकेदुखी ठरते की काय? अशी चिन्हे दिसत असतानाच स्टार्कला शमीने चकवले. एका बाहेर जाणाऱ्या चेंडूला पुल करण्याचा नादात स्टार्क रिषभ पंतकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर एकाकी झुंज देणारा कमिन्सनही बुमराहच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये कोहलीकडे सोपा झेल देत तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या लायनने आक्रमक खेळ केला. पण भारतीय गोलंदाजांनी आजचा दिवस गाजवला. या सामन्यात आश्विन २, इशांत १ तर बुमराह व शमी यांनी प्रत्येकी ३ – ३ विकेट पटकावल्या. ऑस्ट्रेलियाकडून शॉन मार्शने सर्वाधिक ६० तर टिम पेनने ४१ धावा काढल्या. पण कांगारूंना भारतीय आक्रमणापुढे सपशेल हार मानली. भारताने या विजयासह ४ सामन्यांच्या मालिकेत १ – ० ने आघाडी घेतली आहे.

Leave a Comment