गोव्यात जाताय? मग या झपाटलेल्या जागांना भेट देणार?

goahigh
पर्यटनासाठी गोवा हे अनेकांची पहिली पसंती आहे. इतकेच काय दर सुट्टीत गोव्याचा प्लॅन बनविणारे महाभाग अनेक आहेत कारण गोव्याची मोहिनीच तशी आहे. नितांत सुंदर समुद्र किनारे. अनेक भव्य मंदिरे, चर्चेस आणि किल्ले यांची रेलचेल असलेल्या गोव्यात काही जागा मात्र भेट देण्याच्या दृष्टीने साहसी ठरू शकतात कारण या जागा झपाटलेल्या म्हणून प्रसिद्ध आहेत.

याची सुरवात होते मुंबई गोवा महामार्ग १७ पासून. हा हायवे दिवसा प्रवासासाठी खूपच सुंदर आणि आकर्षक वाटत असला तरी येथील काही ठिकाणांवर संध्याछाया उतरू लागल्या कि विचित्र घटना घडू लागतात याच अनुभव अनेकांनी घेतला आहे. या रस्त्यावर काही विचित्र शक्ती असल्याचा अनुभव येतो. विशेषतः कार मधून जाताना कुणाबरोबर मांसाहारी पदार्थ असतील तर गाडीचे दिवे अपोआप सुरु बंद होणे, वाहनाचा वेग अचानक कमी होणे असे अनुभव आल्याचे अनेकजण सांगतात.

church
गोव्यातील बोरिम पूल ओलांडताना कुणीतरी पाण्यात उडी मारल्याचा आवाज येतो आणि कोण पाण्यात पडलेय हे पाहण्यासाठी उतरले तर दिसत कुणीच नाही. कधी कधी गाडीत कुणी अनोळखी मुलगी येऊन बसली आहे असाही भास होतो. त्यामुळे अंधाऱ्या रात्रीत हा पूल ओलांडायचे धाडस सहसा कुणी करत नाही.

येथील थ्री किंग चर्च अशीच आणखी एक वास्तू. या चर्चच्या आवारात अदृश्य शक्ती वावरतात असा अनुभव येतो. दोन राजांमध्ये या चर्चवरून वाद झाला आणि ज्याने चर्चवर कब्जा केला त्याला विरोध करताना दुसर्या राजाने विष पिऊन आत्महत्या केली त्या राजाचा आत्मा येथे वावरतो असा समज आहे.

demelo
डिमेलो हाउस हे असेच झपाटलेले आणखी एक घर. येथे दोन भावांमध्ये भांडणे झाली त्यानंतर एका भावाचा मृत्यू झाला. त्यानंतर या घरातून पावलांचे, रडण्याचे, किंचाळण्याचे आवाज येऊ लागले. हे घर रिकामे असून विक्रीसाठी उपलब्ध आहे पण कमी किमतीतही ते खरेदी करायला कुणी पुढे येत नाही.

Leave a Comment