झोमॅटोने ड्रोनद्वारे फुड डिलिव्हरीसाठी लखनऊची कंपनी केली खरेदी

zomato
लवकरच ड्रोनच्या माध्यमातून फुड डिलिव्हरीला भारतात सुरूवात होण्याची शक्यता असून ऑनलाइन अॅप झोमॅटोने लखनऊची स्टार्टअप कंपनी ‘टेक-इगल इनोवेशंस’ला ड्रोनद्वारे फुड डिलिव्हरीसाठी खरेदी केले आहे. गेल्या काही वर्षांपासून ही कंपनी प्रामुख्याने ड्रोनच्या निर्मीतीवर काम करत आहे. किती रुपयांमध्ये टेक-इगल खरेदी करण्याचा करार झाला याबाबत माहिती अद्याप मिळालेली नाही. झोमॅटोला हब-टू-हब डिलिव्हरी नेटवर्क बनवण्यासाठी टेक-इगल मदत करेल असे झोमॅटोकडून सांगण्यात आले आहे.

आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी विक्रम सिंह मीणा यांनी २०१५मध्ये टेक इगल कंपनीची स्थापना केली. ही कंपनी तेव्हापासून ड्रोन बनवण्यावर काम करत आहे. याबाबत झोमॅटोचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल म्हणाले की, आमचे सर्वात पहिले उद्दिष्ट ५ किलोग्राम वजन असलेली एखादी वस्तू अगदी सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवण्याची क्षमता असणारे मल्टी-रोटर ड्रोन्सची निर्मीती करणे आहे. हे सध्या प्राथमिक टप्प्यात असून भविष्याच्या दृष्टीकोनातून काही आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत. ऑनलाइन ऑर्डर करुन ड्रोनद्वारे डिलिव्हरी मिळण्याची अपेक्षा ग्राहक नक्कीच ठेवू शकतात.