तेलंगणात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८६ कोटीसह ४ लाख लिटर दारू जप्त

liquor
हैदराबाद – निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणातून ८६ कोटी ५० लाख रुपये आणि ४ लाख लिटर अवैध दारू जप्त करण्यात आली. पोलिसांकडून ही कारवाई विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे. याच बरोबर निवडणुकांच्या प्रचारादरम्यान ८ हजार ४०० शस्त्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. दरम्यान उद्या तेलंगणात विधानसभेच्या ११९ जागासाठी मतदान होणार आहे. सर्वच राजकीय पक्ष यासाठी जोमाने प्रचार करत आहेत. प्रचाराकरता यावेळी सर्व पक्षांच्या बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती.

मागील ३ महिन्यांमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान ११ हजार जणांविरोधात अजामीनपात्र अटक वारंट जारी करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. तेलंगणातील ३२ हजार ५७४ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. नक्षलग्रस्त भागात मतदानासाठी निवडणूक विभागकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व केंद्रावर सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. यापैकी काही जागा संवेदनशील आहेत. अशा ठिकाणी अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी दिली. ११ डिसेंबरला निवडणुकींचा निकाल जाहीर होणार आहे.