राज ठाकरेंचे डोके ठिकाणावर नाही: प्रकाश आंबेडकर

prakash-ambedkar
मुंबई – भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना डोके नसल्याचे म्हणत ते माझीच कॉपी करत असल्याची बोचरी टीका केली आहे. तसेच मराठा समाजाची मते मिळवण्यासाठीच राज्यातील भाजप सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला, असे त्यांनी म्हटले आहे.

तीन दिवसांपूर्वी विक्रोळीतील सभेत राज ठाकरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केला होता. आपल्याला दिल्लीवरुन ओवेसींच्या मदतीने देशात राम मंदिराच्या मुद्द्यावरुन दंगली घडवण्याचा डाव असून याबाबत माहिती देणारा फोन आल्याचा दावा त्यांनी केला होता. प्रकाश आंबेडकर यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, हा मुद्दा मी महिनाभरापूर्वीच मांडला होता. राज ठाकरेंना डोके नाही. माझीच कॉपी ते करत असून मी महिनाभरापूर्वीच राम मंदिरावरुन दंगली घडवण्याचा कट असल्याचा आरोप केला होता, असे त्यांनी सांगितले. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

प्रकाश आंबेडकर मराठा आरक्षणावर म्हणाले, भाजपने आरक्षण मराठा समाजाची मते मिळवण्यासाठी दिले. भाजपच्या जागा मराठा समाजाची मते मिळाल्यास १७० पर्यंत जातील, असे मुख्यमंत्र्यांना वाटत असावे. पण त्यांच्या आनंदात मी खडा टाकू इच्छित नसल्याचा टोला त्यांनी लगावला. मराठा समाजाला आरक्षण दिल्याने ओबीसी समाजात भीती निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला. दादर स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.