मुंबई उच्च न्यायालयाने ‘केदारनाथ’ विरोधातील याचिका फेटाळली

kedarnath
एका धार्मिक गटाच्या भावना दुखवणारा असल्याचे सांगत ‘केदारनाथ’ या चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयात या याचिकेवर आज सुनावणी होती. सर्वांचेच लक्ष याकडे लागलेले असताना ‘केदारनाथ’ विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

उच्च न्यायालयाने या चित्रपटाला हिरवा कंदिल दाखवला असून प्रदर्शनाच्या मार्गावर असतानाच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट यानंतर एका धार्मिक भावना दुखावणारा असल्याचा दावा करत चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

याचिकाकर्त्यांनी पवित्र धार्मिकस्थळाच्या नावाने प्रेमकहाणीवर आधारित चित्रपट कसा बनवला जाऊ शकतो? असा सवाल केला. यासोबतच चित्रपटातील काही दृश्यांनाही विरोध होत होता. पण चित्रपटाचे आता परिक्षण करून अनावश्यक भाग सेन्सॉरने आधीच वगळला असल्याचे सांगत उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळत निर्मात्यांना दिलासा दिला आहे.