भाजपच्या तिकिटावर पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार माधुरी दीक्षित?

madhuri-dixit
पुणे – राजकारणात अभिनेत्री माधुरी दीक्षित प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. त्याचबरोबर भाजप आगामी लोकसभा निवडणुकीत माधुरीला पुण्यातून उमेदवारी देण्यात येणार असल्याचेही बोलले जात आहे. निवडणुकीच्या रिंगणात माधुरी दीक्षित उतरणार असल्याच्या बातमीमुळे सध्या पुण्यात आणि विरोधकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

शरद पवार याआधी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरु होती. पण या चर्चांना शरद पवारांनीच पूर्णविराम दिला होता. पण पुण्यातून आता लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजप माधुरी दीक्षितला तिकीट देणार असल्याचे बोलले जात आहे. २०१९ लोकसभा निवडणुकीत भाजप सेलिब्रेटींनी उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपकडून त्यासाठी देशव्यापी सर्वेक्षणही करण्यात आले होते.

भाजपाध्यक्ष अमित शाह काही महिन्यांपूर्वी भाजप संपर्क अभियानासाठी मुंबई दौऱ्यावर आले होते, त्यांनी त्यावेळी माधुरी दीक्षितची तिच्या घऱी जाऊन भेट घेतली होती. माधुरीला त्यावेळी राज्यसभेची ऑफर देण्यात आल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. दरम्यान ज्या मतदारसंघातून माधुरीला उमेदवारी देण्याबद्दल बोलले जात आहे त्या जागेचे प्रतिनिधित्व भाजप खासदार अनिल शिरोळे करत असल्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर गदा येणार का?असा प्रश्न उपस्थित होतो. दरम्यान हे वृत्त राज्यसभेतील भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी फेटाळून लावले आहे.