चारा नसेल तर जनावरांना पाहुण्यांकडे नेऊन सोडा, राम शिंदेंचा अजब सल्ला

ram-shinde
अहमदनगर – पालकमंत्री राम शिंदे यांनी शेतकऱ्यांना दुष्काळ पडला आहे, चारा नसेल तर जनावरांना पाहुण्यांकडे नेऊन सोडा, असा अजब सल्ला दिला आहे. दरम्यान आमदार मोनिका जवळेंनी पाथर्डी पालिकेच्या हद्दीतील गावांसाठी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या छावण्या आणि रोजगार हमीची कामे सुरू करण्यात यावी, अशी मागणी केली होती. शिंदे पाथर्डीमध्ये दुष्काळी परिस्थितीची पहाणी करण्यासाठी आलेल्या पथकाच्या स्वागतासाठी आले होते. त्यांनी हा भलताच सल्ला त्यावेळी दिला. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला असून शिंदेंच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्र हे शहरी भाग असल्याने या क्षेत्रात दुष्काळी उपाययोजना लागू करणे अडचणीचे झाले आहे. अधिकृतरित्या शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर अमलात येणाऱ्या दुष्काळी उपायोजना या केवळ ग्रामीण भागातील दुष्काळी गावांसाठी असतात. संपूर्ण तालुका दुष्काळी असला, तरी नगरपालिकेमुळे तालुक्याचे ठिकाण असलेला भाग शहरी समजला जातो. त्यामुळे दुष्काळी उपाययोजनेचा फायदा आसपासच्या गावांना मिळत नाही. पाथर्डी नगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांनी हीच समस्या घेऊन जनावरांसाठी छावण्या आणि रोजगार हमीची मागणी केली होती.

पण दुष्काळ पडला आहे, तर जनावरांना पाहुण्यांकडे नेऊन सोडा, असा अजब सल्ला पालकमंत्री शिंदे यांनी दिला. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. एकीकडे शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसतो आहे, तर दुसरीकडे पालकमंत्र्यांचे हे वक्तव्य शेतकऱयांची चेष्टा करणारे ठरत आहे.

Leave a Comment