एचआयव्ही संशयित महिलेने केली तलावात आत्महत्या; तलावातून पाणी उपसा सुरू

HIV
धारवाड – हुबळीच्या मराब गावातील तलावात उडी घेऊन एचआयव्हीची संशयित रुग्ण असलेल्या एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली. या तलावाची व्याप्ती तब्बल ३६ एकरात असून गावकऱ्यांसाठी आणि गुराढोरांसाठी हा एकमेव स्त्रोत आहे. पण या तलावात महिलेने आत्महत्या केल्यामुळे गावकऱ्यांचे हा तलाव रिकामा करण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या तलावात एका महिलेने गेल्या आठवड्यात आत्महत्या केली. एचआयव्हीची संशयित रुग्ण ही महिला होती. ही बातमी बघता बघता वाऱ्यासारखी गावभर पसरली आणि भितीने या गावकऱ्यांनी तलावातील पाणीच उपसण्याचा निर्णय घेतला.

हे तलाव रिकामा करण्यासाठी ग्रामपंचायत आणि तालुका प्रशासनावर दबाव आणण्यात आला. प्रशासनाने गावकऱ्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण, पाणी प्यायला गावकऱ्यांनी साफ नकार दिला. धारवाड जिल्ह्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी तर त्यांच्यापुढे हात टेकले आणि अखेर प्रशासनाने या तलावातले पाणी काढायला सुरुवात केली आहे.

दरम्यान, पाण्याने भरलेला तलाव असतानाही ३ किलोमीटरची पायपीट करुन गावकरी मलप्रभा कालव्यातील पाणी पिण्यासाठी वापरत आहेत. तलावातील ६० टक्के म्हणजेच लाखो लीटर पाण्याचा उपसा आतापर्यंत करण्यात आला आहे. उरलेल्या पाण्याचा उपसा करण्यासाठी आणखी ५ दिवस लागतील. आत्महत्या केलेली महिला एचआयव्ही पॉझिटीव्ह होती म्हणून भितीपोटी हा सर्व खट्टाटोप करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.