ही आहेत भारतातील झपाटलेली हॉटेल्स

fear
भारतामध्ये ब्रिटीशांच्या शासन काळाच्या दरम्यान अनेक सुंदर इमारतींचे निर्माण करविण्यात आले होते. यातील अनेक भव्य इमारतींचे रूपांतर आता पंचतारांकित हॉटेल्समध्ये करण्यात आले आहे, तर काही ठिकाणी भव्य वस्तूसंग्रहालये आहेत. यातील बहुतेक इमारतींना ‘हेरीटेज साईट्स’ चा दर्जा देण्यात आला आहे. पण काही इमारतींची मात्र पडझड होऊन आता त्या ठिकाणी त्यांचे केवळ भग्नावशेष शिल्लक राहिले आहेत. प्राचीन काळातील ज्या इमारतींचे हॉटेल्समध्ये रूपांतर करण्यात आले, त्या त्यांच्या स्थापत्यविशारदांच्या नजरेखाली केलेल्या सुंदर निर्मितीमुळे नावाजल्या गेल्याच, पण त्याचबरोबर यातील काही हॉटेल्स झपाटलेली असल्याचे म्हटले जात असल्यामुळे हौशी मंडळींची या हॉटेल्समधील रुची आणखीनच वाढली. अश्याच काही झपाटलेल्या हॉटेल्स विषयी जाणून घेऊ या.
fear2
पश्चिम बंगाल राज्यामध्ये कलीम्पॉन्ग नामक प्रसिद्ध हिल स्टेशन आहे, या ठिकाणी असलेले मॉर्गन हाऊस नामक हॉटेल झपाटलेले असल्याचे म्हटले जाते. जॉर्ज मॉर्गन नामक ब्रिटीश मनुष्य आपल्या पत्नीसमवेत येथे राहत असे. त्याच्या पत्नीच्या देहांतानंतर नैराश्याच्या भरामध्ये जॉर्ज त्याचे घर सोडून निघून गेला. त्यानंतर या घराचे रूपांतर एका लॉजमध्ये करण्यात आले. येथे मुक्कामाला आलेल्या अनेक प्रवाश्यांना चित्रविचित्र अनुभव आले आहेत. उंच टाचांचे बूट घालून कोणी तरी सतत चालत असल्याचा भास येथे राहणाऱ्या लोकांना अनेकदा होत असतो.
fear3
हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी हे ठिकाण येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी मोठे आकर्षण आहे. तसेच या ठिकाणी अनेकदा चित्रपटांचे चित्रीकरण होत असताना ही पाहता येते. सुपरहिट झालेल्या ‘बाहुबली’ चित्रपटातील राजमहालाचा सेट या ठिकाणीच उभारण्यात आला होता. येथे पर्यटकांना राहण्यासाठी हॉटेल्सही बांधली गेली आहेत. मात्र या हॉटेल्समध्ये राहणाऱ्या पर्यटकांना अनेक विचित्र अनुभव आले असल्याचे म्हटले जाते. रात्रीच्या वेळी खोलीतील सामान अचानक इतस्ततः पसरणे, जेवणघरातील प्लेट्स अचानक पडणे असे काही अनुभव येथे राहणाऱ्या पर्यटकांना आले असल्याचे समजते.
fear4
राजस्थान येथील कोटा शहरामध्ये ब्रिज राज भवन नामक हॉटेल आहे. या इमारतीमध्ये ब्रिटीश शासनाच्या काळी मेजर चार्ल्स बर्टन नामक ब्रिटीश अधिकारी रहात असे. या इमारतीचे निर्माण एकोणिसाव्या शतकामध्ये करण्यात आले होते. १८५७च्या बंडामध्ये चार्ल्स बर्टन आणि त्याच्या संपूर्ण परिवाराची या इमारतीमध्ये हत्या करण्यात आली. याच मेजर चार्ल्सचा मृतात्मा आजही या ठिकाणी असल्याचे म्हटले जाते. या हॉटेलच्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी अनेक चित्रविचित्र घटना घडल्याचा लोकांचा अनुभव आहे. याच हॉटेलप्रमाणे उत्तराखंड राज्यातील मसुरी या ठिकाणी असलेल्या सेव्हॉय नामक हॉटेलमध्ये ही एका ब्रिटीश महिलेचे भूत असल्याचे म्हटले जाते. ही महिला या ठिकाणी राहावयास आल्यानंतर या महिलेचा गूढ मृत्यू झाला. तेव्हापासून या महिलेचा मृतात्मा या ठिकाणी असल्याचे म्हटले जाते.
fear5
मुंबईतील सुप्रसिद्ध ताज हॉटेलशी निगडित असेच अनेक चित्रविचित्र प्रसंग येथे राहणाऱ्या पाहुण्यांनी अनुभवले आहेत. तसेच येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी देखील अनेक विचित्र अनुभव घेतले आहेत. या हॉटेलचे डिझाईन ब्रिटीश स्थापत्यविशारद डब्ल्यू ए चेम्बर्स यांनी तयार केले होते. डिझाईन पूर्ण करून ते काही काळासाठी मायदेशी निघून गेले. परत आल्यानंतर त्यांनी डिझाईन केलेल्या हॉटेलच्या रचनेच्या बरोबर विरुद्ध पद्धतीने हॉटेलचे निर्माण झालेले पाहून चेम्बर्स यांनी नैराश्याच्या भरामध्ये याच इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला होता. याच चेम्बर्सचा मृतात्मा आजही या ठिकाणी असल्याचे म्हटले जाते.