निवृत्तीच्या बातमीवर लत्तादिदींचे स्पष्टीकरण

lata-mangeshkar
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी आपण निवृत्त होत असल्याची बातमी खोटी असल्याचे म्हटले असून आपण शेवटच्या श्वासापर्यंत गात राहणार असेही त्या म्हणाल्या. सोशल मीडियावर लता मंगेशकर यांनी गायलेले ‘आता विसाव्याचे क्षण’ हे गीत पोस्ट करण्यात आले आहे. या गाण्याचा संदर्भ देत लता मंगेशकर यांच्यासाठी आता विश्रांतीचा वेळ झालीय असा अर्थ काढण्यात आला आहे. त्या आता निवृत्त होत असल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे त्यांचे चाहते नाराज झाले आहेत.

लता मंगेशकर यावर म्हणाल्या, ही अफवा कुणी आणि का सुरू केली? हे काम कुणातरी रिकाम्या मुर्ख माणसाचे असल्याचे मला वाटते. मला दोन दिवसापूर्वी अचानक रिटायरमेंटचे फोन यायला सुरुवात झाली. ही बातमी कुठुन आली याबद्दल लताजी परेशान आहेत. त्या म्हणाल्या, मला लक्षात आले की, ‘आता विसाव्याचे क्षण’ या माझ्या गाण्याकडे निवृत्तीचे गाणे म्हणून पाहिले जात आहे. पण मी हे गाणे पाच वर्षापुर्वी गायले होते. हे गीत घेऊन २०१३ मध्ये संगीतकार सलील कुलकर्णी माझ्याकडे आले होते. मी हे गीत गाण्यासाठी तयार झाले, याचे मुख्य कारण म्हणजे हे गीत बा. भ. बोरकर यांनी लिहिले होते. मी यापूर्वी त्यांची कविता कधी गायले नव्हते. पाच वर्षानंतर काही खोडसाळ मेंदूचे लोक याला माझ्या निवृत्तीशी जोडतील हे मला माहिती नव्हते. आपली निवृत्तीचा कोणताही विचार नसल्याचे लताजी म्हणाल्या. शेवटच्या श्वासापर्यंत गात राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.