संपुआ नेत्यांना लाच दिल्याचा आरोप ख्रिश्चिअन मिशेलने नाकारला

Christian-Michel
नवी दिल्ली – बुधवारी पटियाला हाऊस न्यायालयात इटलीतील कंपनी ऑगस्टा वेस्टलँडबरोबर व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर व्यवहारात झालेल्या घोटाळ्यातील दलाल ख्रश्चियन मिशेलला सादर करण्यात आले.

संपुआ सरकारमधील कुठलाही नेता किंवा संरक्षण मंत्रालयातील कुठल्याही अधिकाऱ्याला लाच दिल्याचा आरोप व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या हेलिकॉप्टर घोटाळयातील आरोपी ख्रिश्चिअन मिशेलने फेटाळून लावला आहे. पण ऑगस्ट वेस्टलँडकडून सल्लामसलत फी म्हणून पैसे घेतल्याचे मान्य केले आहे. ही हेलिकॉप्टर इटलीच्या ऑगस्टा वेस्टलँड कंपनीकडून खरेदी करण्यात आली होती.

मंगळवारीच सौदी अरेबियाने कुठल्याही अटी-शर्तीशिवाय भारताला मूळ ब्रिटीश नागरिक असलेल्या ख्रिश्चिअन मिशेलचे प्रत्यार्पण केले. सीबीआय न्यायालयाने त्याला पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. पैसे दिल्याचा उल्लेख ख्रिश्चिअनचे हस्ताक्षर असलेल्या चिठ्ठयांमध्ये आहे पण मी डिस्लेक्सिक आजाराचा रुग्ण असून लिहू शकत नाही असा दावा आता त्याने केला आहे. राजकीय नेते आणि नोकरशहांना पैसे दिल्याच्या नोंदी ज्या चिठ्ठयाांमध्ये आहेत त्या गुइडो हास्चके या युरोपियन मध्यस्थाने लिहिल्याचा दावा त्याने केला आहे.

पीटर ह्युलेटने सोनिया गांधींशिवाय तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग, तत्कालिन संरक्षण मंत्री प्रणव मुखर्जी आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा असे मिशेलने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे. त्यावेळी ऑगस्टा वेस्टलँडचा भारतातील सेल्स विभागाचा पीटर ह्युलेट प्रमुख होता.

या लाच प्रकरणाची जबाबदारी गुइडो हास्चकेवर ढकलण्याचा प्रयत्न ख्रिश्चिअन मिशेल करत आहे. त्याला जेणेकरुन स्वत:ला आणि भारतात ज्यांच्याबरोबर त्याचे संबंध आहेत त्यांना वाचवता येईल असे सीबीआय अधिकाऱ्याने सांगितले. त्याला सर्वकाही माहित आहे पण आमच्या प्रश्नांना तो त्याच्या इच्छेनुसार उत्तर देत आहे. आमच्याकडे काही व्यवहारांची कागदपत्रे असल्याचे समजल्यानंतर तो थोडा आक्रमक झाला असे अधिकाऱ्याने सांगितले.