कांगारूंसमोर ‘विराट सेने’चे लोटांगण; पहिल्या दिवसअखेर भारत ९ बाद २५०

cheteshwar-pujara
अॅडलॅड – भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर चेतेश्वर पुजाराच्या शतकाच्या बळावर ९ बाद २५० धावांपर्यंत मजल मारली. पुजाराने एकीकडे गडी बाद होत असताना एक बाजू लावून धरली आणि १२३ धावांची खेळी केली. त्याने या बरोबरच आपल्या कसोटी कारकिर्दीतील ५ हजार धावांचा टप्पादेखील पूर्ण केला. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्क, हेजलवूड, कमिन्स आणि लायन यांनी २-२ बळी टिपले. तर पुजारा धावबाद झाला.

भारताने या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारतीय फलंदाजांनी आपल्या अवसानघातकी खेळीने हा निर्णय चुकीचा ठरवला. भारतीय फलंदाजाच्या उणीवांचा फायदा घेत मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स या जलदगती त्रिकुटाने ऑफ स्टम्पच्या बाहेर मारा केला आणि भारतीय फलंदाजांना जाळ्यात अडकवले. जोश हेजलवूडच्या गोलंदाजीवर अशाच पद्धतीने सलामीवीर लोकेश राहुल स्लिपमध्ये झेल देऊन माघारी परतला. यानंतर मिचेल स्टार्कने मुरली विजयचा अडसर दूर करत भारताला दुसरा धक्का दिला. यानंतर मैदानावर आलेला विराट कोहली भारताचा डाव सावरेल, अशी आशा वाटत असतानाच गलीमध्ये उभ्या असलेल्या उस्मान ख्वाजाने पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर विराटचा झेल टिपल्यामुळे पहिल्या ड्रिंक्स ब्रेकपर्यंत भारताची अवस्था ३ गड्यांच्या मोबदल्यात २५ धावा अशी झाली होती. त्यानंतर मैदानात आलेल्या रोहित शर्माने चेतेश्वर पुजाराच्या साथीने फटकेबाजी करत भारताला अर्धशतकी मजल मारून दिली. उपहाराच्या सत्रापर्यंत भारताची अवस्था ४ बाद ५६ धावा अशी झाली होती.

दुसऱ्या सत्रात चांगली फलंदाजी करणारे रोहित शर्मा आणि ऋषभ पंत दोघेही बाद झाले. चांगली सुरुवात मिळूनदेखील दोघांना त्या खेळीचे मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही. रोहित शर्मा फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात ३७ धावांवर बाद झाला. नंतर ऋषभ पंतने झटपट धावा करण्याचा प्रयत्न केला. पण तोदेखील एका बचावात्मक फटक्यावर झेलबाद झाला. फिरकीपटू लायनने त्याला २५ धावांवर तंबूत धाडले. पुजाराने अश्विनला हाताशी घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अश्विनदेखील २५ धावांवर माघारी परतला. इशांत शर्माला ४ धावांवर स्टार्कने त्रिफळाचीत केले. त्यानंतर पुजाराने शतक केल्यावर फटकेबाजी केली, पण धावा चोरण्याचा प्रयत्नात तो धावबाद झाला आणि दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.

Leave a Comment