आपल्या आईकडून नम्रता शिका – ओवैसींचा राहुल गांधी यांना सल्ला

Asaduddin-Owaisi
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपला अहंकार बाजूला ठेवावा आणि आपल्या आई सोनिया गांधी यांच्याकडून नम्रता शिकावी, असा सल्ला मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुसलमीन (एमआयएम) पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी दिला.

“तुम्ही जर पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमचा अहंकार सोडा. माझी नम्र विनंती आहे, की तुम्ही तुमच्या आईकडून नम्रता आणि प्रामाणिकपणा शिकावा. साधेपणा राजकारणात आपल्याला खूप दूर घेऊन जातो, हे त्यांनी सिद्ध केले आहे, ‘असे असदुद्दीन म्हणाले.

हैद्राबाद येथे एआयएमआयएम पक्षाच्या उमेदवारासाठी मंगळवारी रात्री घेतलेल्या एका सभेत ओवैसी बोलत होते. राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छोटे भाऊ म्हणून शोभत असल्याची टीका करून ओवैसी म्हणाले, की काँग्रेस अध्यक्षाजवळ काहीही नाही तरी ते अहंकार दाखवतात. ‘हीच तुमची वृत्ती राहिली तर मी संपूर्ण आयुष्यभर तुमच्याशी लढा देईन,’ असे ते म्हणाले.

आपण 12 वर्षे काँग्रेस पार्टीला पाठिंबा दिला होता, याची आठवण करून देऊन ओवैसी म्हणाले, की राहुलने आमच्या पक्षाशी केलेल्या गुप्त सौद्यांचे तपशील जाहीर करावेत.