६ दिवसांमध्ये ‘२.०’ने केली ५०० कोटींची कमाई

2.0
गेल्या गुरुवारी दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि ‘खिलाडी’ अक्षय कुमार यांचा ‘२.०’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट आता घसघसशीत कमाई करत आहे. अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड्स पहिल्याच दिवशी मोडणाऱ्या या चित्रपटाने अवघ्या ६ दिवसांमध्ये ५०० कोटींची धमाकेदार कमाई केली आहे.

२९ नोव्हेंबरला हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदी अशा ३ भाषांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०० कोटींचा गल्ला जमवला होता. चित्रपटात ३ डी तंत्रज्ञान, स्पेशल इफेक्ट्स, ग्राफिक्स या सर्वांचा पुरेपुर वापर करण्यात आल्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या कमाईत आठवड्याच्या शेवटीही विक्रमी वाढ झाली असल्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे.

६०० कोटी एवढे एस. शंकर दिग्दर्शित या चित्रपटाचे बजेट आहे. पण चित्रपटाची भव्यता पाहता चित्रपट लवकरच ६०० कोटींचा आकडादेखील पार करेल, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. २०१० ला आलेल्या रजनीकांतच्या रोबोट या चित्रपटाचा ‘२.०’ हा सिक्वल आहे.