२८७ कोटींची मालकीण असलेली राजस्थानमधील सर्वांत तरुण उमेदवार

kamini-jindal
अवघ्या काही दिवसांवर राजस्थान विधानसभेची निवडणूक येऊन ठेपली आहे. सध्या श्रीगंगानगर मतदारसंघाच्या कामिनी जिंदल या प्रतिनिधी आहेत. राजेरजवाड्यांना मागे टाकेल एवढी त्यांची मालमत्ता आणि संपत्ती आहे. यात विशेष म्हणजे पंजाब युनिव्हर्सिटीमधून एम.फिलची डिग्री घेतलेल्या कामिनी सर्वांस तरुण आमदार आहेत. लाखो रुपयांची घड्याळे कामिनी यांच्याकडे आहेत. त्याचबरोबर बीएमडब्ल्यू कारसुद्धा आहे. कामिनी यांच्या संपत्तीत मागच्या पाच वर्षांत ९० कोटींची वाढ झाली आहे. यंदाच्या निवडणुकीतल्या त्या सर्वांत श्रीमंत उमेदवार ठरल्या आहेत.

कामिनी जिंदाल यांच्याकडे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या मालमत्तेच्या हिशोबानुसार २८७ कोटी रुपयांची स्थावर जंगम मालमत्ता आहे. एवढी संपत्ती आतापर्यंत फक्त राजघराणे किंवा संस्थानिक यांच्याकडेच असायची. बीएमडब्ल्यूबरोबरच एसयूव्ही फॉर्च्युनरसुद्धा कामिनी यांच्याकडे आहे. कामिनी यांनी २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार राधेश्याम गंगानगर यांना ३७ हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने हरवले होते. कामिनी यांच्याकडे अडीच किलो सोने आणि २३.४७ किलो चांदीचे दागिने आहेत.

कामिनी जिंदाल यांच्या बँक खात्यांत २३ कोटींची रक्कम जमा आहे. रोख रकमेच्या त्यांनी दिलेल्या हिशोबाप्रमाणे त्यांच्याकडे ३,१०,००० तर त्यांच्या पतीकडे ३५,००० रुपये रोख होते. कामिनी यांच्याकडे असलेल्या शेअर्स आणि कंपन्यांचे मूल्य २३७ कोटी ५९ लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. विमा कंपन्यांना प्रीमिअम म्हणूनच त्या १७,६६,८४२ रुपये जमा करतात. कामिनी यांना महागड्या घड्याळांचा शौक आहे. त्यांच्याकडे ६ लाखांहून अधिक किमतीची घड्याळे आहे. जमीनदार पार्टीचे अध्यक्ष बी. डी. अग्रवाल यांच्या कामिनी जिंदाल या कन्या आहेत. त्यांनी आयपीएस ऑफिसर गगनदीप यांच्याशी लग्न केले आहे.