या रहस्यमयी शहराच्या रहिवाश्यांकडे आहे अलौकिक सिध्दी

horror
एखादी व्यक्ती मृतात्म्यांशी संवाद साधू शकते असे आजच्या काळामध्ये कोणी आपल्याला सांगितले, तर आपला त्यावर विश्वास बसेलच असे नाही. आजचे युग हे विज्ञानाचे आहे आणि जगामध्ये घडणाऱ्या सर्वच गोष्टींना वैज्ञानिक आधार आहेत. त्यामुळे या विज्ञानाच्या कक्षेच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी या जगामध्ये घडत असतात हे मान्य करणे आपल्या काहीसे कठीणच जाते. पण या जगामध्ये एक शहर असे ही आहे, जिथे केवळ एखाद्याच व्यक्तीला नाही, तर बहुतांश लोकांना अलौकिक सिद्धी प्राप्त असल्याचे म्हटले जाते. मृतात्म्यांशी संवाद साधू शकण्याची अलौकिक सिद्धी या लोकांना प्राप्त असल्याचे म्हटले जाते.
horror1
अमेरिकेतील कासाडागा टाऊन हे शहर जगातील काही रहस्यमयी शहरांपैकी एक म्हणावे लागेल. या शहराला ‘सायकिक कॅपिटल’ या नावाने देखील संबोधले जाते. या शहरामध्ये राहणारे बहुतेक लोक मनोविज्ञानामध्ये पारंगत असून, ‘पॅरानॉर्मल सायन्सेस’ मध्ये प्रवीण आहेत. या जगामध्ये हयात नसलेल्या लोकांच्या आत्म्यांशी संवाद साधण्याची सिद्धी या शहरातील बहुतांश लोकांना प्राप्त असल्याचे म्हटले जाते. १८७५ साली न्यूयॉर्क येथील अध्यात्मिक गुरु जॉर्ज कॉल्बी यांनी हे शहर वसविले होते. सुरुवातीला काही मोजेकेच रहिवासी असणाऱ्या शहराची ख्याती जशी सर्वत्र पसरू लागली, तसे अध्यात्मिक शक्तींकडे ओढा असणारे लोक या ठिकाणी येऊन स्थायिक होऊ लागले. येथे राहून त्यांनी अनेक अलौकिक सिद्धी प्राप्त केल्या असल्याचे म्हटले जाते.
horror2
आजच्या काळामध्ये या शहरामध्ये अलौकिक सिद्धी प्राप्त असलेले शंभराच्या वर गुरु आहेत. या सर्वांमध्ये काही दैवी शक्ती असल्याचे म्हटले जात असून, ज्यांना आपल्या दिवंगत नातलगांशी किंवा प्रियजनांशी संपर्क साधण्याची इच्छा असते असे लोक या गुरूंची सहायता घेत असल्याचे समजते. तसेच ज्यांच्यावर तथाकथित मुतात्म्यांचा पगडा आहे, असे लोकही या संकटापासून मुक्ती मिळविण्यासाठी येथे हजारोंच्या संख्येने दर वर्षी येत असल्याचे समजते. येथील गुरु हस्तरेखाविद्या आणि टॅरो कार्ड रीडिंग करून भविष्यवाणी करण्यात आणि मृताम्यांचे संदेश त्यांच्या प्रियजनांपर्यंत पोहोचविण्यातही पारंगत असल्याचे म्हटले जाते.