गौतम गंभीर ‘या’ पक्षाकडून लोकसभेच्या रिंगणात उतरणार ?

gautam-gambhir
नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने निवृत्तीची घोषणा केली आहे. क्रीडावर्तृळातून भारतीय संघासाठी मोलाची कामगिरी बजाविणाऱ्या गंभीरच्या या निर्णयामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. पण क्रिकेटच्या मैदानावरून निवृत्तीची घोषणा करणारा गंभीर ‘पॉलिटिकल इनिंग’ सुरू करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

राजकीय पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपने पुन्हा एकदा सत्तेचा सोपान गाठण्यासाठी कंबर कसल्यामुळे बहुमताचा आकडा आगामी निवडणुकीत गाठण्यासाठी भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. क्रिकेटपटू, अभिनेत्यांना त्यासाठी उमेदवारी देण्याची तयारी भाजपने केली आहे. क्रिकेटपटू गौतम गंभीरचे नाव त्या यादीत आघाडीवर आहे.

यापूर्वीही क्रिकेटपटू गौतम गंभीर निवडणूक लढविणार असल्याचे वृत्त समोर आले होते. गंभीर हा मूळ दिल्लीचा राहणारा आहे. भाजप दिल्लीतील खासदार मीनाक्षी लेखींऐवजी गंभीरला संधी देण्याची शक्यता असून पक्ष लेखी यांच्या कामगिरीवर नाराज असल्यामुळे भाजप गंभीरला दिल्लीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये गंभीर भारतासाठी अखेरचा सामना खेळला होता. गंभीरची प्रतिमा आणि त्याच्या वलयाचा फायदा भाजपला दिल्लीत होऊ शकतो.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर गौतम गंभीर मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेला दिसून येत आहे. काही तासांपूर्वीच गंभीरने राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावरून केजरीवाल सरकारवर टिकेची झोड उठविली होती. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ‘संपर्क फॉर समर्थन’ अभियान हाती घेतले होते. त्याअंतर्गत शहा यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांची भेट घेतली होती. शहा यांनी अभिनेत्री माधुरी दिक्षीत, कपिल देव यांची भेट घेतली होती. त्यानंतर उमेदवारीची चर्चा जोर धरू लागली.

Leave a Comment