डिसेंबर महिन्यामध्ये भारतातील निरनिरळ्या राज्यांमध्ये साजरे होत आहेत हे उत्सव

festival
डिसेंबरचा महिना म्हटला, की मस्त गुलाबी थंडी आणि अर्थातच चांगल्या हवामानाचा आनंद घेत सुट्टीच्या निमित्ताने आखलेले प्रवासाचे बेत हे समीकरण काहीसे पक्केच झाले आहे. जर प्रवासाला जाण्याचे बेत आखत असाल, तर भारतातील निरनिराळ्या राज्यांमध्ये साजऱ्या होत असणाऱ्या उत्सवांना हजेरी लावण्याचा विचार अवश्य करावा. हे उत्सव त्या-त्या राज्यांची खासियत असल्यामुळे त्यावेळी त्या राज्यांमध्ये पर्यटकांची भरपूर गर्दी होत असते. अगदी विदेशातून भारतदर्शनासाठी येणारे पर्यटकही या सोहळ्यांमध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात.
festival1
कच्छ, गुजरात येथे आयोजित केल्या जाणाऱ्या ‘रण उत्सवा’ला गेल्या काही वर्षांपासून आता जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळत आहे. केवळ भारतभरातूनच नाही तर जगभरातील अनेक देशांतील पर्यटक येथे आवर्जून येत असतात. कच्छच्या शुभ्र रणामध्ये आयोजित होणाऱ्या या सोहळ्यामध्ये अनेक गुजराती लोककलाकार आपल्या कलांचे प्रदर्शन करण्यासाठी येत असतात. येथे पर्यटकांना राहण्यासाठी सर्व सुविधांनी युक्त असे तंबू उभारण्यात येतात. या ठिकाणी संगीत, नृत्य, हस्तकला, आणि अर्थातच उत्तमोत्तम खाद्यपदार्थ यांचा आनंद पर्यटकांना घेता येतो. यंदाचा रणोत्सव १ नोव्हेंबर पासून २० फेब्रुवारी २०१९ पर्यंत सुरु राहणार आहे.
festival2
ओडिशामध्ये आगळा वेगळा ‘आंतरराष्ट्रीय सँड आर्ट फेस्टिव्हल’ कोणार्क येथे आयोजित करण्यात येतो. या सोहळ्यामध्ये जगभरातील कलाकार सहभागी होत असून, यांच्या मार्फत बनविल्या गेलेल्या वाळूच्या शिल्पांचे प्रदर्शन या सोहळ्यामध्ये पाहता येते. सर्वोत्तम शिल्प बनविणाऱ्या शिल्पकाराला एक लाख रुपयांचे बक्षीसही देण्यात येत असते. ज्यांना वाळूची शिल्पे पाहण्यास आवडतात, त्यांनी या प्रदर्शनाला आवर्जून हजेरी लावावी. हा सोहोळा डिसेंबरच्या महिन्यामध्ये आयोजित केला जात असतो. यंदाच्या वर्षी हा उत्सव १ ते ४ डिसेंबर या दरम्यान कोणार्क येथील चंद्रभागा बीचवर सुरु राहणार आहे.
festival3
‘सोहळ्यांचा सरताज’ म्हणून ओळखला जाणारा असा नागालँडचा ‘हॉर्नबिल फेस्टिव्हल’ नागा जमातींसाठी अतिशय महत्वाचा आणि पवित्र सोहोळा समजला गेला आहे. नागालँडमध्ये अनेक जातीजमाती असून, या सर्वांचा या सोहळ्यामध्ये सहभाग असतो. अतिशय सुंदर दिसणाऱ्या ‘हॉर्नबिल’ पक्ष्यावरून या उत्सवाचे नाव पडले आहे. या उत्सवादरम्यान अनेक प्रदर्शने, नृत्य आणि संगीताचे कार्यक्रम, निरनिराळे खेळ आणि अर्थातच ‘फूड फेअर’चे ही आयोजन केले जात असते. यंदाच्या वर्षी १ डिसेंबर ते १० डिसेंबरच्या दरम्यान हा उत्सव कोहिमा जवळील किसामा या ठिकाणी होणार आहे.

Leave a Comment