पोर्टलंड येथील अनोखे ‘आऊटब्रेक म्युझियम’

portland
घरच्याघरी लोणचे घालून मुरविलेल्या बीटच्या सेवनाने कोणाला मृत्यू आला, तर सुपरमार्केटमधील ‘रेडी टू इट’ पदार्थ खाल्ल्याने कोणाचे प्राण गेले. त्याचप्रमाणे चीझ, गोठविलेला (फ्रोझन) पिझ्झा, ब्रेकफास्ट सिरीयल (कॉर्नफ्लेक्स, म्युसली इत्यादी), तर कधी टॅटू बनविण्यासाठी वापरली जाणारी विशिष्ट प्रकारची शाई, आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे देखील अनेक लोक प्राणांना मुकले आहेत, किंवा कधीही बऱ्या न होणाऱ्या व्याधी आणि परिणामी शारीरिक अपाय अनेकांना सहन करावे लागले आहेत.
portland1
अश्याच प्रकारच्या वस्तू ओरेगन, पोर्टलंड येथे असलेल्या आगळ्या वेगळ्या ‘आऊटब्रेक म्युझियम’ येथे आहेत. या वस्तूंच्या वापरामुळे किंवा या वस्तू सेवन केल्या गेल्यानंतर प्राणघातक आजारांचा संसर्ग (आऊटब्रेक) होऊन अनेक लोकांचा त्यामध्ये मृत्यू झाला होता, तर अनेकांना कायमस्वरूपी शारीरिक व्याधींना तोंड द्यावे लागले होते. अश्याप्रकारच्या प्राणघातक, अनेक लोकांच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या वस्तू या संग्रहालयामध्ये असल्याने या संग्रहालयाला ‘आऊटब्रेक म्युझियम’ म्हणून संबोधले जाते.
portland2
ओरेगन येथील आरोग्य विभागाची शासकीय कार्यालये असलेल्या इमारतीमध्ये केवळ एकाच खोलीमध्ये हे संग्रहालय आहे. १९९३ सालापासून प्राणघातक वस्तूंचे किंवा खाद्यपदार्थांचे संकलन या संग्रहालयाने केले असून, यामध्ये शंभराहून अधिक वस्तूंचा संग्रह पहावयास मिळतो. या सर्व वस्तू काचेच्या कपाटांमध्ये बंदिस्त असून, काही वस्तू मूळ स्वरूपात आहेत, तर काहींच्या प्रतिकृती येथे पाहण्यास मिळतात. यातील प्रत्येक वस्तू प्राणघातक आहे असे नाही, तर केवळ थोडीफार शारीरिक व्याधी ज्यांमुळे उद्भाविली अश्याही वस्तू या संग्रहामध्ये आहेत.
portland3
तसेच एखाद्या रुग्णाला विकार उद्भविल्यानंतर किंवा त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे कारण शोधून काढण्यासाठी कसे प्रयत्न केले गेले याची ही सविस्तर माहिती येथे उपलब्ध आहे. आपण बाजारातून विकत घेत असलेल्या वस्तू क्वचित किती घातक ठरू शकतात याचे प्रत्यक्ष उदाहरण हे संग्रहालय देत असते.

Leave a Comment