लुधियानामधील चार शेतकरी सलमानच्या चित्रपटामुळे झाले लखपती

salman-khan
आपल्या आगामी मल्टिस्टारर चित्रपट ‘भारत’च्या चित्रीकरणात सलमान खान व्यस्त आहे. या चित्रपटाचे परदेशातील चित्रीकरण पूर्ण झाले आणि सध्या लुधियानात अली अब्बास जाफरच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. पण हा चित्रपट रिलीजआधीच वादात अडकला आहे.

या चित्रपटाला एका हिंदू संघटनेने विरोध केला आहे. वाघा बॉर्डरचा सेट लुधियानात उभारण्यात आल्यामुळे संपूर्ण परिसराला बॉर्डरचे रुप आले आहे. चित्रपटात सीन असल्याकारणाने त्या ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा उभारण्यात आला आहे. संघटनेकडून नेमका याचाच विरोध होत आहे. भारतीय भूमीवर पाकिस्तानी झेंडा उभारला जाऊ नये असे या संघटनेचे म्हणणे आहे. लुधियाना पोलीस आयुक्तांकडेही याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सुरक्षेच्या कारणास्तव बीएसएफने वाघा बॉर्डरवर शुटिंगला नकार दिल्याने सेट लुधियानात उभारण्यात आला आहे. चित्रपटात असे काही सीन आहेत ज्यामध्ये अभिनेत्याला सीमारेषा ओलांडून पाकिस्तानात जायचे असते.

दरम्यान चित्रपटाच्या लुधियानात होत असलेल्या शुटिंगमुळे चार शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या टीमने सेट उभारण्यासाठी चार शेतकऱ्यांची १९ एकर जमीन भाड्याने घेतली आहे. शेतकऱ्यांना प्रत्येक एकराच्या हिशेबाने ८० हजार रुपये देण्यात आले आहेत. चारही शेतकऱ्यांनी एकूण १५ लाख २० हजार रुपये मिळणार आहेत.