नाताळच्या सणानिमित्त विंडसर पॅलेस येथे भव्य सजावट

castel
ब्रिटनची राणी एलिझाबेथ नाताळचा सण तिच्या परिवाराच्या सोबत नॉरफोक येथील तिच्या खासगी सँड्रींगहॅम इस्टेट येथे साजरा करीत असली, तरी तिचे औपचारिक शाही निवासस्थान असलेल्या विंडसर कासल येथे देखील नाताळच्या सणानिमित्त डिसेंबर महिन्यामध्ये भव्य सजावट दर वर्षी करण्यात येत असते. नाताळचा सण आपल्या परिवारासमवेत नॉरफोक येथील सँड्रींगहॅम इस्टेट येथे साजरा करण्याची परंपरा शाही परिवारामध्ये १९८० सालापासून सुरु झाली. तत्पूर्वी नाताळचा शाही सोहोळा विंडसर कासल येथे होत असे. तेव्हा आयोजित होत असलेल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये शाही परिवारातील सदस्य देखील उत्साहाने सहभागी होत असत. आता शाही परिवार नाताळच्या सणासाठी विंडसर कासल मध्ये वास्तव्य करीत नसला, तरी या ठिकाणी या सणानिमित्त केल्या जाणाऱ्या सजावटीची परंपरा आजही कायम आहे.
castel1
ही सजावट भव्य दिव्य असून, अतिशय सुंदर रंगसंगतीचा वापर करीत विंडसर पॅलेसची सजावट करण्यात येते. तसेच या वेळी उत्तमोत्तम, किंमती फर्निचरची आकर्षक मांडणी या वेळी करण्यात येते. ही सजावट करण्यासाठी गेले अकरा महिने काम सुरु असून, ‘लँटर्न लॉबी’, शाही डायनिंग रूम, ‘ग्रँड रिसेप्शन रूम’ इत्यादी शाही कक्षांची सजावट करण्यात येत असते. या सर्व सजावटीचे मुख्य आकर्षण वीस फुट उंचीचे भले मोठे ‘नॉर्डमन फर ट्री’ असून, विंडसर येथे असलेल्या सेंट जॉर्ज हॉलमध्ये हे क्रिसमस ट्री उभारण्यात येते. या क्रिसमस ट्री वर सोन्याच्या आभूषणांनी सजावट करण्यात येत असून, राजमुकुटाच्या छोट्या छोट्या प्रतिकृती, पाईन कोन्स आणि सुंदर रोषणाईने हे ट्री सजविण्यात येते.
castel2
विंडसर कासलच्या परिसरामध्ये सर्वत्र फुलांची सुंदर पुष्पचक्रे सजविण्यात येत असून, या सर्व परीसरामध्ये असणाऱ्या दिव्यांच्या खांबांवरही फुलांची सजावट करण्यात येत असते. तसेच आम जनतेसाठी मोजक्या शाही संपत्तीचे प्रदर्शन आणि मनोरंजनाचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जात असतात. यंदाच्या वर्ष आयोजित प्रदर्शनामध्ये प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल यांनी त्यांच्या विवाहप्रसंगी परिधान केलेले पोशाख प्रदर्शित करण्यात आले आहेत. ही सर्व सजावट करीत असताना त्यामुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची ही संपूर्णपणे काळजी घेण्यात येत असून, या सजावटीसाठी प्लास्टिक किंवा प्रदूषण पसरविणाऱ्या कोणत्याही तत्सम वस्तूचा वापर कटाक्षाने टाळला जात असतो.

Leave a Comment