असा होता बाराव्या शतकामध्ये कर्नाटक प्रांतातील उच्चभ्रू भारतीयांचा आहार

ate
दही-वड्यापासून डोसा, ते अगदी भाजलेले उंदीर इथपर्यंत चित्रविचित्र पदार्थ, बाराव्या शतकामध्ये भारतातील कर्नाटक प्रांतामध्ये प्रचलित असावेत असे सांगणारा, संस्कृत भाषेमध्ये लिहिला गेलेला पाककृतींचा संग्रह ‘मानसोल्लास’, हा आजवर अस्तित्वात असलेल्या पाककृतींच्या संग्रहापैकी सर्वात प्राचीन म्हणून ओळखला जातो. या संग्रहाच्या माध्यमातून या प्रांतामध्ये खाद्यसंस्कृती त्या काळामध्ये कशी असेल, याची कल्पना आपण करू शकतो. त्या काळी पाककला किंवा खाद्यसंस्कृतीला मोठे महत्व दिले जात असून, केवळ पदार्थ कसे बनविले जात असत या बद्दलच नाही, तर ते कसे खाल्ले जावेत किंवा कसे खाल्ले जाऊ नयेत, कोणत्या ऋतूमध्ये त्यांचे सेवन केले जावे, याचीही वर्णने या संग्रहामध्ये आढळतात. इतकेच नव्हे, तर एखादा पदार्थ कसा बनविला जावा, त्यामध्ये कोणकोणते साहित्य किती प्रमाणांत वापरले जावे, आणि हा पदार्थ कश्या प्रकारे खाल्ला जावा याचे ही सविस्तर वर्णन करणारा असा हा संग्रह आहे.

अकराव्या शतकामध्ये अस्तित्वात असलेल्या चालुक्य साम्राज्याचे सम्राट राजा भूलोकमल्ल सोमेश्वर (तिसरे) यांच्या काळी ‘मानसोल्लास’ची निर्मिती झाली. या ग्रंथातील रचना कविता रूपात असून, यामध्ये शंभर अध्याय विविध विषयांवर आधारित आहेत. यामध्ये राजनिती, अर्थशास्त्र, खाद्यसंस्कृती, संगीत, मनोरंजन, आणि क्रीडा अश्या विविध विषयांचा समावेश आहे. हा ग्रंथ त्याकाळचा ‘एन्सायक्लोपिडिया’ म्हणावा लागेल. कारण यामध्ये हत्तींना युद्धाचे प्रशिक्षण कसे द्यावे इथपासून रयतेवर कर कसे लावले जावेत इथपर्यंत आणि त्याशिवाय स्त्रियांनी प्रसाधन कसे अरावे याबद्दलही सविस्तर माहिती या ग्रंथामध्ये दिली गेली आहे.
ate1
या ग्रंथाच्या तिसऱ्या भागामध्ये वीस अध्याय हे खाद्यसंस्कृतीवर आधारलेले आहेत. सुमारे १८२० च्या वर कविता या अध्यायांमध्ये असून, त्यामध्ये ‘डोसाका’ ( डोसा), ‘पोलिका’ (पुरणपोळी), इथपासून ते अगदी भाजलेले उंदीर आणि कासव इथपर्यंत सर्व पदार्थांची वर्णने आहेत. या पदार्थांवरून, त्याकाळी या प्रांतामध्ये उच्चभ्रू वर्गाचा आहार कसा असावा, याची कल्पना येते. कोणता पदार्थ कोणत्या ऋतूमध्ये खाल्ला जावा याबद्दलही सविस्तर सूचना या संग्रहामध्ये आढळतात. गोड व थंड पदार्थ उन्हाळ्यामध्ये, खारे पदार्थ पावसाळ्यामध्ये आणि मसालेदार पदार्थ हिवाळ्यामध्ये खाल्ले जावेत अशी सूचना यामध्ये असून, आहार षड्रसांनी परिपूर्ण असण्याला ही महत्व दिले गेले आहे. तसेच कोणते पदार्थ कोणत्या पदार्थांच्या जोडीने खावेत किंवा खाऊ नयेत या बद्दलच्या ही सविस्तर सूचना या संग्रहामध्ये देण्यात आल्या आहेत.

या संग्रहामध्ये उल्लेखिलेल्या पाककृतींमध्ये डाळी, कडधान्ये, भाज्या आणि फळांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये आढळतो. तसेच ही सर्व फळे देशी असून, यामध्ये एकाही परदेशी फळाचा उल्लेख आढळत नाही. त्याकाळी भारतामध्ये चाळीस निरनिराळ्या प्रकारची फळे मिळत असल्याचे यावरून दिसून येते. तसेच ‘पुरिका'( पुरी) आणि दह्यामध्ये बुडविलेले उडदाच्या डाळीचे वडे (दहीवडे) यांच्याही पाककृती या संग्रहामध्ये आहेत. मांसाहारामध्ये मासे वापरून बनविल्या जाणाऱ्या पस्तीस पदार्थांच्या कृती या संग्रहामध्ये आहेत. तसेच भाजलेले मांसाचे वडे (कबाब), आणि तत्सम मांसाहारी पदार्थांच्या कृती देखील या संग्रहामध्ये आहेत.

Leave a Comment