फ्ल्यू दूर ठेवण्यासाठी आहारामध्ये करा या पदार्थांचा समावेश

flu
सध्या हवापालट होताना जाणवू लागला आहे. उकाड्याचे दिवस सरून आता हवेमध्ये हलकी थंडी जाणवू लागली आहे. हवामान बदलत असताना बहुतेक वेळी सर्दी पडश्यासोबतच तापाने देखील लोक आजारी पडताना दिसू लागतात. अधून मधून अवेळी डोकावणाऱ्या पावसाने हजेरी लावल्यामुळे तर फ्ल्यूचा धोका आणखीनच वाढण्याची शक्यता असते. या फ्ल्यूला दूर ठेवण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे अतिशय आवश्य आहे. ही रोगप्रतिकारशक्ती चांगली राहण्याकरिता हवामान बदलत असताना आणि एरव्ही देखील आहारामध्ये काही पदार्थांचा समावेश करणे अगत्याचे आहे.
flu1
पालक, ‘केल’ नामक पालेभाजी, कोबी आणि ब्रोकोली सारख्या हिरव्या भाज्यांमुळे शरीराला अनेक पोषक तत्वे मिळत असतात. या भाज्यांमध्ये असेलली अ,क, इ जीवनसत्व, क्षार आणि इतर पोषक तत्वांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या आहारामध्ये लसूण समाविष्ट करावी. पदार्थाचा स्वाद वाढविण्याचे काम लसूण करतेच, त्याशिवाय यामध्ये असलेल्या अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणांमुळे लसुणाचे सेवन आरोग्याच्या दृष्टीने देखील अतिशय फायद्याचे ठरते. लसूणामध्ये असलेल्या गुणकारी तत्वांचा शरीराला सर्वाधिक फायदा मिळावा यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी थोड्याश्या कोमट पाण्याबरोबर एका लसणीच्या पाकळीचे सेवन करावे. हे लसूण भाजून किंवा तळून न घेता कच्चेच खावे.
flu2
आपल्या शरीरामध्ये घातक जिवाणूंप्रमाणे चांगले जीवाणू ( good bacteria ) देखील असतात. हे चांगले जीवाणू पचनक्रियेला सुरळीत ठेवण्यास सहायक असून, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासही सहायक असतात. यांच्यामुळे शरीरामध्ये कोणत्याही प्रकारची संक्रमणे रोखण्यास मदत मिळते, व चयापचय शक्ती चांगली ठेवण्यासही हे जीवाणू सहायक असतात. प्रोबायोटिक्स अश्या प्रकारच्या चांगल्या जीवाणूंचे स्रोत आहेत. दही, लस्सी, ताक हे पदार्थ नैसर्गिक प्रोबायोटिक्स असल्याने यांचा समावेश आहारामध्ये अवश्य करावा.
flu3
संत्री, पेरू, अननस, यांसारख्या फळांमध्ये क जीवनसत्वाचे प्रमाण मुबलक असते. हे जीवनसत्व रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास सहायक असते. तसेच मशरूम्स ही शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी आहेत. यामध्ये ड जीवनसत्व असून, यामध्ये अनेक फायटो-न्यूट्रीयंटस् ही आहेत. मशरुम्सचे सेवन भाजीमध्ये, सूप्समध्ये किंवा सॅलड्समध्ये घालून करता येते.

Leave a Comment