लाखो डॉलर्स मूल्याचा शाही ऐतिहासिक ‘पोर्टलंड टियारा’ गायब !

portland
ब्रिटीश राजघराण्याची संपत्ती कोट्यवधी डॉलर्स मूल्याची आहे. या शाही संपत्तीमध्ये आभूषणे, आणि हिरेजडीत मुकुटांचा देखील समावेश आहे. यातील, शाही घरण्याची मालमत्ता असणारा, बहुमूल्य हिरेजडीत ‘पोर्टलंड टियारा’ चोरीला गेल्याचे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. नॉटिंगहॅमशायर येथील ‘डिस्प्ले केस’ ( प्रदर्शनामध्ये ठेण्यात येणारी काचेची पेटी )मधून हा लाखो डॉलर्स किंमतीचा ‘टियारा’, म्हणजेच मुकुट गायब झाला आहे. १९०२ साली पोर्टलंडच्या डचेस विनिफ्रेड यांच्यासाठी तयार करण्यात आलेला हा राजमुकुट, ब्रिटनचे राजे सातवे एडवर्ड यांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने तयार करण्यात आला होता.

हा राजमुकुट ‘वेलबेक इस्टेट’ येथील ‘पोर्टलंड कलेक्शन गॅलरी’ येथे ठेवण्यात आला होता. ज्या रात्री हा मुकुट चोरीला गेला, त्या रात्री चोरांनी हा मुकुट ठेवेलेल्या पेटीची काच आधुनिक उपकरणांच्या मदतीने तोडून त्यातून हा मुकुट काढून घेतला असल्याचे समजते. हे पेटी तोडली गेल्यानंतर सिक्युरिटी अलार्मही वाजले, परंतु पोलिसांना आणि संबंधित सुरक्षा अधिकाऱ्यांना या ठिकाणी पोहोचण्यास काही क्षणांचा विलंब झाला. तेवढ्या अवधीतच चोरांनी या मूल्यवान मुकुटासह पोबारा केला. प्रसारमाध्यमांनी प्रसिध्द केलेल्या वृत्तानुसार चोरीच्या ठिकाणी अलार्म वाजल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी पोहोचण्यास नव्वद सेकंदांचा अवधी लागला असून, त्या अवधीतच चोरांनी पलायन केले असल्याचे समजते. मुकुटाची चोरी करणारे चोर सिल्व्हर रंगाच्या ऑडी S5 गाडीतून आले असावेत असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. अश्याच वर्णनाची गाडी पोलिसांना चोरी झालेल्या ठिकाणापासून काही अंतरावर सापडली आहे.
portland1
शाही राजमुकुटांच्या संग्रहामध्ये पोर्टलंड टियारा अतिशय बहुमूल्य मुकुटांपैकी एक आहे. हा चोरलेला राजमुकुट अतिशय प्रसिद्ध आणि शाही मालमत्ता असल्याने त्याची बाहेर विक्री करणे कठीण असले, तरी हा मुकुट मोडून त्यामध्ये जडविलेले हिरे विकल्यास या मुकुटाचा मागमूस लागणे कठीण होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment