अॅमेझॉन विकत घेणार बिग बाजार!

big-baazar
आंतरराष्ट्रीय पातळीवरची ई-विक्री कंपनी अॅमेझॉन भारतातील प्रमुख रिटेल कंपनी बिग बाजारमध्ये हिस्सा विकत घेण्याच्या तयारीत आहे. तसेच रिटेलचे राजे समजले जाणारे किशोर बियाणी हे बिग बाजारची मालकी असलेल्या फ्यूचर ग्रुपमधून बाहेर पडू शकतात, अशी चर्चा आहे.

अॅमेझॉनने भारतात सुमारे 5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. खाद्य क्षेत्रात सुमारे 50 कोटी डॉलरची गुंतवणूक करण्याची परवानगी अॅमेझॉनला सरकारकडून मिळाली आहे. अॅमेझॉनने सुमारे दोन महिन्यांपूर्वी आदित्य बिर्ला रिटेलकडून मोअर सुपरमार्केट्समध्ये भाग विकत घेतला होता. त्याचा पुढचा भाग म्हणून अॅमेझॉनने बिग बाजार विकत घेण्याची तयारी सुरू केली आहे. किशोर बियाणी हे अॅमेझॉनशी याबाबत मोठ्या सौद्याबाबत चर्चा करत आहेत, असे इकोनॉमिक टाईम्स वृत्तपत्राने म्हटले आहे. मात्र दोन्ही कंपन्यांनी आतापर्यंत याबाबत अधिकृत भूमिका मांडलेली नाही.

फ्यूचर ग्रुपचे मालक असलेल्या बियाणी यांनी या वर्षाच्या सुरूवातीला अमेरिकेत अॅमेझॉनचे मालक जेफ बेजॉस यांची भेट घेतली होती. दोन्ही कंपन्यांच्या मालकांनी भागीदारी आणि अन्य मुद्द्यांबाबत चर्चा केली होती. अॅमेझॉन हळूहळू फ्यूचर ग्रुपही विकत घेणार असून येत्या 8-10 वर्षांत ती फ्यूचर समुहातील बियाणी यांचा संपूर्ण वाटा विकत घेईल, असेही वृत्तपत्राने म्हटले आहे.

Leave a Comment