नाताळचे प्रमुख आकर्षण- न्यूयॉर्कचे सुप्रसिद्ध ‘रॉकफेलर क्रिसमस ट्री’

chrismas-tree
यंदाचे वर्ष न्यूयॉर्क येथील ‘रॉकफेलर क्रिसमस ट्री लायटिंग’चे ८६वे वर्ष आहे. या क्रिसमस ट्रीची सजावट पूर्ण होऊन त्याची ‘लायटिंग सेरिमनी’ नुकतीच न्यूयॉर्क येथे पार पडली. दर वर्षी हे क्रिसमस ट्री उजळल्यानंतर खऱ्या अर्थाने नाताळच्या सणाची न्यूयॉर्कमध्ये सुरुवात होत असते. रॉकफेलर क्रिसमस ट्रीची रोषणाई पाहण्यासाठी दर वर्षी हजारोंच्या संख्येने लोक येथे येत असतात. इतकेच नव्हे तर या रोषणाईचे थेट प्रक्षेपण देखील प्रसारमाध्यमांच्या द्वारे केले जात असते. त्यामुळे जे लोक ही रोषणाई पाहण्यासाठी प्रत्यक्षात हजेरी लाऊ शकत नाहीत, त्यांना घरबसल्या रोषणाईचा हा अभूतपूर्व सोहोळा पाहता येतो.
chrismas-tree1
यंदाच्या वर्षीचे हे ‘नॉर्वे स्प्रूस’ (क्रिसमस ट्री) तब्बल ८७ फुट उंचीचे असून, त्याचे वजन बारा टन आहे. या झाडाचे ‘शेल्बी’ असे नामकरण करण्यात आले असून, न्यूयॉर्कमधील वॉल्कील भागामध्ये राहणाऱ्या शर्ली फिगेरुआ आणि लिसेट गुटीयरेझ यांनी हे क्रिसमस ट्री भेट दिलेले आहे. १४ नोव्हेंबर रोजी हे झाड रॉकफेलर प्लाझा इथे उभारण्यात येऊन त्यावर भला मोठा ‘स्वारोव्स्की स्टार’ लावण्यात आला. या स्टारचे डिझाईन सुप्रसिद्ध स्थापत्यकार डॅनियल लीबेसकिंड यांचे असून, तीन मिलियन चमकदार स्वारोव्स्की क्रिस्टल्स वापरून ही चांदणी तयार करण्यात आली आहे. या चांदणीचा आकार नऊ फुट चार इचांचा असून, यामध्ये एलईडी लाईट्सद्वारे रोषणाई करण्यात आली आहे.
chrismas-tree2
प्रत्यक्ष क्रिसमस ट्रीला रोषणाई करण्यासाठी वापरण्यात आलेल्या दिव्यांच्या माळांची एकूण लांबी पाच मैल इतकी भरली आहे. या क्रिसमस ट्रीची रोषणाई संध्याकाळी साडेपाच वाजल्यापासून रात्री साडे अकरा पर्यंत सुरु असते. पुढील वर्षीच्या सात जानेवारी पर्यंत ही रोषणाई केली जाणार आहे. ही रोषणाई पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दी होत असल्याने रोषणाई सुरु होण्याच्या काही तास आधीपासूनच लोक येथे गर्दी करू लागतात. अतिशय सुंदर रोषणाईने नटलेले हे भव्य क्रिसमस ट्री पाहण्याचा अनुभव नक्कीच रोमांचक ठरेल यात शंका नाही.

Leave a Comment