असा आहे इतिहास ‘विक्रम-वेताळ’च्या कथांचा

vikram
आपण सर्वांनीच लहानपणी विक्रम आणि वेताळाच्या कथा ऐकल्या आहेत, वाचल्याही आहेत. इतकेच काय पण १९८०-९० च्या दशकामध्ये लहानाचे मोठे होत असलेल्या पिढीने विक्रम वेताळाच्या कथा दूरदर्शनवर ही मालिकेच्या रूपाने पाहण्याचा आनंद घेतला आहे. तसेच त्या काळी प्रसिद्ध होत असलेल्या ‘चांदोबा’, आणि तत्सम कॉमिक्स मध्ये देखील या रोचक कथा आपण सर्वांनीच वाचल्या आहेत, आणि चित्ररूपामध्ये पहिल्या ही आहेत. अश्या या ‘वेताळ पंचविशी’चा इतिहास या कथांच्या इतकाच मोठा रोचक आहे. पंचवीस कथांचा हा मूळ संग्रह ‘पिशाची’ नामक भाषेमध्ये लिहिला गेला होता. काळाच्या ओघामध्ये ही भाषा जरी लुप्त झाली असली, तरी या कथा मात्र लोकप्रिय होत राहिल्या.
vikram1
पिशाची ही भाषा ‘भूतभाषा’ या नावाने देखील ओळखली जात असे. त्या काळी ही भाषा बोलणाऱ्यांना मानाने पाहिले जात नसे. ही भाषा प्राकृत भाषेवरून आली असून, साधारण तिसऱ्या ते सहाव्या शतकाच्या दरम्यान मध्य भारतामध्ये ही भाषा बोलली जात असे. आजच्या काळामध्ये या भाषेविषयी फारशी माहिती अस्तिवात नसली, तरी काही प्राचीन ग्रंथामध्ये या भाषेचे ओझरते उल्लेख सापडतात. काही भाषाकरांच्या मते, ही भाषा पुढे पाली भाषेमध्ये सामावली असून, अन्य काही भाषाकारांच्या मते ही भाषा कोंकणी भाषेमध्ये परिवर्तीत झाली असल्याचे म्हटले जाते. ‘बृहत्-कथा’ हा या भाषेमध्ये लिहिला गेलेला सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. या ग्रंथामाढेच विक्रम आणि वेताळाचा सर्वप्रथम उल्लेख आढळतो.
vikram2
विक्रम आणि वेताळाच्या कथांचा उल्लेख ‘कथासरीतसागर’ या कथासंग्रहामध्ये ही आढळतो. अकराव्या शतकामध्ये लिहिल्या गेलेल्या या कथासंग्रहामध्ये अनेक पौराणिक कथा आहेत. कश्मीरी पंडित सोमदेव यांनी अकराव्या शतकामध्ये या कथासंग्रहाचे निर्माण केले. या कथासंग्रहातील बाराव्या खंडामध्ये ‘वेताळ पंचविशी’ आढळते. विक्रम आणि वेताळाच्या कथेमध्ये मुख्य पात्र आहे उज्जैनचा राजा विक्रमादित्य याचे. विक्रम राजाने एका तांत्रिकाला दिलेली वचनपूर्ती करण्यासाठी, त्यानुसार वेताळाला पकडण्यासाठी तो जंगलामध्ये जातो. इथून वेताळपंचविशीचे कथानक सुरु होते. वेताळाला पकडून आणण्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नादरम्यान त्याला एक कथा वेताळ सांगतो. या प्रत्येक कथेचा शेवट एक प्रश्नामध्ये होत असून, या प्रश्नांची उकल करण्यास वेताळ विक्रमाला सांगतो. सरतेशेवटी विक्रम राजा वेताळाची मुक्तता करतो आणि वेताळही राजाला गरज पडेल तेव्हा त्याच्या मदतीला येण्याचे वचन देतो, असा या वेताळपंचविशीचा शेवट आहे.

Leave a Comment