सट्टे व्यवसायात माहीर राजस्तानातील फालोडी गाव

phalodi
राजस्थानच्या वाळवंटी भागात जगभरातील पर्यटकांना आकर्षून घेणारे फालोडी नावाचे छोटे गाव तेथील प्राचीन राजवाडे मंदिरे यासाठी जसे प्रसिद्ध आहे तशीच या गावाची ख्याती सट्टे बाजाराचे प्रमुख केंद्र अशीही आहे. ५० हजार वस्तीच्या या गावात २० ते २२ सट्टे व्यावसायी असून याशिवाय दलाल, सट्टा लावणारे यांची संख्याही मोठी आहे. विशेष म्हणजे निवडणुकीवर येथे जो सट्टा लागतो त्यातील बहुतेक अंदाज बरोबर येतात.

falaudi
या गावात क्रिकेट, पाऊस, निवडणुका आणि मटका अश्या चार प्रकारचे सट्टे खेळले जातात. मुख्य चौकात सकाळी ११ पासून ते रात्री उशिरापर्यंत सट्टेबाजाची वर्दळ सुरु असते. सट्टा खेळणे बेकायदा असल्याने येथील बहुतेक सर्व व्यवहार तोंडी स्वरुपात आणि परस्पर विश्वासावर होतात. येथील सट्टा व्यापारी वर्तमानपत्रे, टीव्ही बातम्या आणि फोनवरून माहिती मिळवितात आणि त्यानुसार दर ठरतात. ज्या उमेदवारावर जास्त रक्कम बोली लावली जाते त्याची परिस्थिती नाजूक तर ज्याच्यावर कमी बोली लागते त्याच्या विजयाची शक्यता अधिक मानली जाते. आता राजस्तानात निवडणुकीचे वारे असल्याने हा बाजार जोरात आहे. मात्र फालोडी मध्ये विधानसभेचा उमेदवार स्थानिक असल्याने पक्षपातीपणा होऊ नये म्हणून या जागेचा सट्टा घेतला गेलेला नाही.

namak
या गावात देशात पहिली निवडणूक झाली तेव्हापासून निवडणूक सट्टा लावला जातो अशी आठवण सांगितली जाते. मात्र एवढीच या गावाची ओळख नाही. येथे १५ व्या शतकातील हमीर महाल, अनेक मंदिरे आवर्जून पहावीत अशी आहेत तसेच येथे हिवाळ्यात स्थलांतरित पक्षी मोठ्या संख्येने येतात. ते पाहण्यासाठी पक्षी प्रेमी गर्दी करतात. या गावाची ओळख सॉल्ट सिटी अशीही आहे. येथे मोठ्या प्रमाणावर मीठ उत्पादन केले जाते. येथील ओसाड पडलेल्या एका किल्ल्यात हिमायून बादशहा अडचणीत सापडला तेव्हा त्याने आश्रय घेतला होता असेही सांगितले जाते.

Leave a Comment