या खास मंदिरामध्ये होते बजरंगबलींसोबत त्यांच्या पत्नीची ही पूजा

hanuman
वास्तविक महाबली हनुमानाने सदैव ब्रह्मचर्याचे पालन केल्याची मान्यता असली, तरी तेलंगाणा राज्यातील खम्मम जिल्ह्यामध्ये मात्र बजरंगबली हनुमान यांच्या मंदिरामध्ये, हनुमानांच्या सोबत त्यांच्या पत्नीची देखील मनोभावे पूजा केली जाते. हनुमान बाल ब्रम्हचारी असल्याची मान्यता सर्वमान्य असून, आजीवन ब्रम्हचार्याचे पालन करणाऱ्यांचे, ते आराध्य दैवत म्हटले जाते. पण अनेक ठिकाणी महाबली हनुमान विवाहित असल्याच्या आख्यायिकाही प्रसिद्ध आहेत.
hanuman1
महाबली हनुमान यांचा विवाह, सूर्याची कन्या सुवर्चला हिच्याशी झाला असल्याची आख्यायिका आहे. पराशर संहितेमध्ये हनुमानाचा सुवर्चलेशी झालेल्या विवाहाचा उल्लेख सापडतो. तेलंगाणा राज्याच्या खम्मम जिल्ह्यामध्ये असलेल्या या प्राचीन मंदिरामध्ये हनुमान आणि सुवर्चला या दोघांचीही पूजा केली जात असते. या मंदिराला येथे ‘श्री सुवर्चला सहित हनुमान मंदिर’ या नावाने ओळखले जाते. येथे दर वर्षी ज्येष्ठ शुध्द दशमीच्या दिवशी हनुमान आणि सुवर्चलेचा विवाहोत्सव मोठ्या जल्लोषाने साजरा करण्याची परंपरा आहे.
hanuman2
महाबली हनुमान यांचा विवाह नेमका कसा पार पडला याची मोठी रोचक कथा आहे. पराशर संहितेनुसार हनुमानाने सूर्याला आपला गुरु मानले होते. सूर्याजवळ असलेल्या नऊ दिव्य विद्या हनुमानाला प्राप्त करून घेण्याची इच्छा होती. त्या शिकून घेण्यासाठी हनुमानाने सूर्याला आपला गुरु मानले. त्यानुसार सुर्यादेवांकडे असलेल्या पाच विद्यांचे ज्ञान त्यांनी हनुमानाला दिले खरे, पण उर्वरित चार विद्या हनुमानाला द्याव्यात अथवा नाही असा प्रश्न सुर्यादेवांच्या मनामध्ये येऊ लागला. यामागे कारण असे होते, की उर्वरित चार विद्या प्राप्त करण्यासाठी हनुमानाने विवाहित असणे आवश्यक होते. पण हनुमान बाल ब्रम्हचारी असल्याने या विद्या त्यांना कश्या द्याव्यात असा प्रश्न सूर्यदेवांना पडला.
hanuman3
या प्रश्नावर तोडगा म्हणून सूर्यदेवांनी हनुमानाला विवाह करण्यास सुचविले. तेव्हा हनुमानाला देखील प्रश्न पडला. एकीकडे त्याला विद्या प्राप्त करून घ्यायच्या होत्या, पण दुसरीकडे त्याने ब्रम्हाचर्याचा स्वीकारही केला होता. हनुमानाच्या मनातील पेच जाणून घेऊन सूर्यदेवांनी आपली पुत्री सुवर्चला हिच्याशी हनुमानाने विवाह करण्याबद्दल सुचविले. सूर्यदेवांची कन्या सुवर्चला ही हनुमानासाठी योग्य कन्या असल्याचे सांगून ती अतिशय तेजस्वी कन्या असल्याचे सूर्यदेवांनी हनुमानाला सांगितले. हा विवाह करण्याने हनुमानाच्या दोन्ही इच्छा पूर्ण होणार होत्या. आपल्या घोर तपश्चर्येमध्ये लीन असलेली सुवर्चला विवाहानंतर पुन्हा तपश्चर्येस बसणार असल्याने हनुमानाचा विवाहही पार पडणार होता आणि त्याचे ब्रम्हचर्याचे व्रत ही मोडणार नव्हते. त्यामुळे हनुमानाने सुवर्चलेशी विवाह केला असल्याची ही कथा आहे. ‘श्री सुवर्चाला सहित हनुमान’ हे मंदिर तेलंगाणा राज्याच्या खम्मम जिल्ह्यामध्ये, हैदराबादपासून सुमारे २२० किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिरामध्ये श्री हनुमान आणि श्री सुवर्चला देवी या दोहोंच्या मूर्ती आहेत. या मंदिरामध्ये दर्शनास येणाऱ्या भाविकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असा ही या मंदिराचा महिमा आहे.