अपंगत्वावर मात करत ई-रिक्षा चालक बनली ‘माया’

जयपूर – ई-रिक्षा चालक बनण्याचे स्वप्न राजस्थानमधील भिलवारा येथील पोलिओ झालेल्या महिलेने अपंगत्वावर मात करत पूर्ण केले असून या २ मुलांची आई असलेल्या ३७ वर्षीय महिलेचे नाव माया राठोड असे आहे. जिगरबाज मायाने आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी रिक्षा चालवण्याचा पर्याय निवडला आहे.

माया म्हणाली, की अपंगांकडे लोकांची पाहण्याची मानसिकता बदलण्याची माझी इच्छा होती. मी कोणत्याच गोष्टीला माझी स्वप्ने पूर्ण करण्याच्या आड येऊ दिले नाही. मला माझ्या इच्छाशक्तीनेच माझ्या ध्येयाकडे वाटचाल करण्याची ताकद दिली. माझी इच्छाशक्तीही वाढत्या आव्हानांसोबतच वाढत राहिली.

खंबीर मानसिकतेचे उदाहरण मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या मायाने निर्माण केले आहे. वयाच्या ६ व्या वर्षी तिला पोलिओ झाला. पण तिच्या आईने तिची स्वप्ने पूर्ण करताना तिला प्रत्येक ठिकाणी पाठिंबा दिल्याचे आणि प्रेरित केल्याचे तिने सांगितले. राज्यशास्त्राची पदव्युत्तर पदवी मायाने घेतली आहे. तिचे २००५ ला लग्न झाले. आता तिला २ मुलेही आहेत.

याबाबत मायाने सांगितले, की तिने सुरुवातीला खासगी नोकरी केली. पण त्यातून मिळकत खूपच कमी असल्याने रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. ती आता प्रत्येक महिन्याला ८ ते १० हजार रुपये मिळवत आहे. स्पर्धा परीक्षा देत असताना तिला राजस्थान सरकारच्या अपंगांसाठीच्या ई-रिक्षा योजनेची माहिती मिळाली. मी विचार केला, महिला जर विमान चालवू शकतात, तर रिक्षा का नाही? पहिल्यांदा मी रिक्षा घेऊन रस्त्यावर आल्यानंतर लोकांना तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न पडले होते. मला यापासून परावृत्त करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. मात्र, चांगल्या कामाला विरोध होतोच आणि त्यातूनही पलीकडे जायचेच, असा निर्धार मी केला.