ब्रिटिश संसदेकडून फेसबुकची कागदपत्रे जप्त

वापरकर्त्यांची माहिती लीक झाल्याची चौकशी करणाऱ्या ब्रिटिश संसदेच्या एका समितीने फेसबुकची कागदपत्रे जप्त केली आहेत. अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे.

केंब्रिज अॅनालिटिका डेटा घोटाळ्याची तपासणी करणाऱ्या समितीने आपल्या कायदेशीर अधिकारांचा वापर करून ही कागदपत्रे ताब्यात घेतली. हा घोटाळा बाहेर येण्यापूर्वी फेसबुकमधील डेटा आणि गोपनीय नियंत्रणासंदर्भात या कागदपत्रांमध्ये माहिती असल्याचे सांगण्यात आले आहे.

हा कागदपत्रांचा साठा जवळ असलेल्या फेसबुकच्या एका अधिकाऱ्याने ब्रिटनला कामाच्या संदर्भात भेट दिली होती. त्यावेळी त्याला रोखून त्याच्याकडून हे दस्तावेज मिळविण्यात आले, असे दि ऑब्झर्व्हर या वृत्तपत्राने म्हटले आहे.

कॉमन्स डिजीटल, कल्चर, मीडिया आणि स्पोर्ट (डीसीएमएस) कमिटीचे चेअरमन डॅमियन कॉलिन्स यांनी संसदेच्या क्वचितच वापरल्या जाणाऱ्या अधिकारांचा वापर करून या अधिकाऱ्याला दस्तावेज देण्याची सक्ती केली. या आदेशाचे पालन करण्यासाठी त्याला दोन तासांची मुदत देण्यात आली. तसेच आदेशाचे पालन न केल्यास त्याला दंड व तुरुंगवास ठोठावण्यात येईल, अशा इशारा देण्यात आला.

“हे अभूतपूर्व पाऊल आहे परंतु ही परिस्थितीही अभूतपूर्व आहे. फेसबुककडून उत्तरे मिळविण्यात आम्हाला अपयश आले आहे आणि आमचा विश्वास आहे की या दस्तावेजांमध्ये सार्वजनिक हिताची अत्यंत महत्त्वाची माहिती आहे,” असे श्री कॉलिन्स यांनी या वृत्तपत्राला सांगितले.

Leave a Comment